राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर चीनला झोंबली मिर्ची; ग्लोबल टाइम्समधून युद्धाची धमकी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

ग्लोबल टाइम्सचे एडिटर शिजिन यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला असाही सल्ला दिला की, चर्चा करताना भारतासोबत तीच भाषा वापरा जी भारताला समजते. 

बिजिंग - लडाख सीमेवरून भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीन घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. राजनाथ सिंह यांनी चीनचं पितळ उघडं पाडल्यानंतर ग्लोबल टाइम्सने म्हटलं की, चीन शांतता आणि युद्ध दोन्हींसाठी तयार आहे. तसंच चिनी सैन्याच्या दबावामुळे भारतीय लष्कर नरमाईची भूमिका घेत असल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने म्हटलं की, पीएलए पेगाँग तलावाच्या जवळ बारत चीन सीमेवर सैन्य तैनात केले जात आहे. भारत चीन सीमावाद शांततेत सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे पण आपल्या सैन्यालासुद्धा सज्ज ठेवायला हवं असंही ग्लोबल टाइम्सने म्हटलं आहे. भारतातील राष्ट्रवादी विचारांनी सोप्या मार्गाने जाणं नाकारलं आणि कठोर भूमिका घेतली असंही चीनने म्हटलं आहे. 

हे वाचा - लडाख सीमेवर तणाव वाढणार; चीनचा सामना कऱण्यासाठी भारताची रणनीती

ग्लोबल टाइम्सचे एडिटर शिजिन यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला असाही सल्ला दिला की, चर्चा करताना भारतासोबत तीच भाषा वापरा जी भारताला समजते. याआधी शिजिन यांनी म्हटलं होतं की, चिनी सैन्य भारतीय टँकला उद्ध्वस्त करण्याचा अभ्यास करत आहे. जर भारत मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या पंचसुत्रीला लागू करणार नसेल तर चीन सडेतोड उत्तर देण्यास तयार आहे असंही त्यांनी सांगितलं. 

हे वाचा - सीमा बदलण्याचा ‘ड्रॅगन’चा प्रयत्न

दरम्यान, चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अन्य देशांकडून शस्त्र खरेदीला वेग दिला असून देशांतर्गत देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती केली जात आहे. आत्मनिर्भर मोहिमेअंतर्गत आता देशामध्येच ‘प्रॉपल्ड एअर डिफेन्स गन मिसाईल सिस्टिम’ आणि ‘क्लोज क्वार्टर कार्बाईन’ची निर्मिती करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने यासाठी अन्य देशांसोबत झालेले ३ अब्ज डॉलरचे करार रद्द केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने हे करार पुढे ढकलण्यात येत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global times report china ready for both peace and war after rajnath singh comment