ट्रम्प यांच्या निर्णयावर गुगल, फेसबुक, ऍपलला चिंता

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

अमेरिकेतील उद्योग, व्यवसायात इतर देशातील अभियंते आणि तंत्रज्ञांचे मोठे योगदान आहे. अमेरिकेत इतर देशातील मनुष्यबळाचे प्रमाणही मोठे आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे उद्योग-व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

वॉशिंग्टन - सात देशांतील मुस्लिम नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर गुगल, फेसबुक, ऍपल, नेटफ्लिक्‍स यांच्यासह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य काही कंपन्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील उद्योग, व्यवसायात इतर देशातील अभियंते आणि तंत्रज्ञांचे मोठे योगदान आहे. अमेरिकेत इतर देशातील मनुष्यबळाचे प्रमाणही मोठे आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे उद्योग-व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे गुगलमधील 187 कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. अमेरिकेत कार्यरत असलेल्या गुगलच्या कर्मचाऱ्यांनी देशाबाहेर जाण्याचे कार्यक्रम रद्द करावेत आणि जे कर्मचारी सध्या अमेरिकेत नाहीत त्यांनी कंपनीशी संपर्क साधावा, असे पत्रक गुगलने जारी केले आहे. ऍपलमधील काही कर्मचाऱ्यांनी ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांच्याकडे ट्रम्प यांच्या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यावर "कंपनीतील सह-कर्मचारी आणि कंपनीवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबाबत आम्ही व्हाईट हाऊसमध्ये जाणार आहोत', अशी माहिती टीम कुक यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. "ट्रम्प यांच्या निर्णयामुळे नेटफ्लिक्‍सच्या जगभरातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे अमेरिका अधिक सुरक्षित नव्हे तर तेथे सुरक्षेचा अभाव जाणवणार आहे', अशा प्रतिक्रिया नेटफ्लिक्‍सचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. फेसुबकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनीही ट्रम्प यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुस्लिम नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याची घोषणा ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वीच केली होती. आता त्यांनी या आश्‍वासनाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच त्यांनी मुस्लिम बहुल सात देशांतील शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्यास नकार दिला आहे. तसेच या देशातील नागरिकांनी अमेरिकेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांची "अत्यंत सखोल चाचणी' घेण्याचा विशेष आदेशही जारी केला आहे.

Web Title: Google, Apple, Netflix, More Tech Companies Protest Trump's Immigration Order