H1-B visa : एचवन-बी व्हिसाचा ‘ग्रेस पिरीयड’ वाढविणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grace period of H1-B visa will extended Biden Advisory Subcommittee Recommendation

H1-B visa : एचवन-बी व्हिसाचा ‘ग्रेस पिरीयड’ वाढविणार?

वॉशिंग्टन : अमेरिकेत नोकरी गमावलेल्या एचवन-बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या ६० दिवसांच्या वाढीव कालावधीची (ग्रेस पिरीयड) मुदत १८० दिवस करण्याची शिफारस अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या एका सल्लागार उपसमितीने केली आहे. यामुळे भारतीयांसह हजारो कर्मचाऱ्यांना नवी नोकरी शोधण्यासाठी पुरेसा अवधी मिळू शकेल.

जगातील बलाढ्य माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा तसेच ॲमेझॉन, ट्विटर यांसारख्या कंपन्या गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात नोकर कपात जाहीर करीत आहे. त्यामुळे हजारो एचवन -बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना भवितव्याची चिंता भेडसावत असताना नव्या नोकरीच्या शोधासाठी वाढीव कालावधीची मुदत वाढल्यास त्यांना दिलासा मिळणार आहे. हा कालावधी सध्या ६० दिवसांचा असल्याने तेवढ्या काळात व्हिसा प्रायोजित करण्यासाठी दुसरी कंपनी शोधण्याची निकड असते नाही तर देश सोडावा लागतो.

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सल्लागार उपविभागीय समितीने नोकरी गमावलेल्या एचवन- बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांसाठी ६० दिवसांची वाढीव मुदत १८० दिवसांपर्यंत करण्याची शिफारस सरकारला केली आहे. यामुळे नवी नोकरी किंवा अन्य पर्याय शोधण्यासाठी त्यांना जास्त वेळ मिळू शकेल. सैद्धांतिक किंवा तांत्रिक कौशल्याधारित कामासाठी परदेशी कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्याची परवानगी अमेरिकेतील कंपन्यांना ‘एचवन-बी’ व्हिसाद्वारे दिली जाते. हा ‘नॉन-इमिग्रंट’ व्हिसा आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या दरवर्षी चीन व भारतासारख्या देशांमधील हजारो कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतात.

टॅग्स :Visa