हाफीज समर्थकांची पाकिस्तानात निदर्शने

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

भारत आणि अमेरिकेचा दबाव असल्याचा आरोप; पाक लष्कराकडून मात्र समर्थन

लाहोर: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याला काल (ता. 30) पाकिस्तान सरकारने 90 दिवसांसाठी स्थानबद्ध केल्यानंतर आज त्याच्या समर्थकांनी पाकिस्तानात अनेक ठिकाणी निदर्शने केली. पाकिस्तान सरकारने हाफीजला भारत आणि अमेरिकेच्या दबावामुळेच स्थानबद्ध केल्याचा आरोप या समर्थकांनी केला आहे.

भारत आणि अमेरिकेचा दबाव असल्याचा आरोप; पाक लष्कराकडून मात्र समर्थन

लाहोर: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याला काल (ता. 30) पाकिस्तान सरकारने 90 दिवसांसाठी स्थानबद्ध केल्यानंतर आज त्याच्या समर्थकांनी पाकिस्तानात अनेक ठिकाणी निदर्शने केली. पाकिस्तान सरकारने हाफीजला भारत आणि अमेरिकेच्या दबावामुळेच स्थानबद्ध केल्याचा आरोप या समर्थकांनी केला आहे.

सईदवर कारवाई करण्याची भारताची पाकिस्तानकडे जुनी मागणी आहे. अमेरिकेमध्येही सरकार बदलल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांबाबतचे धोरण अत्यंत कडक केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने सईदला काल लाहोरमध्ये स्थानबद्ध केले. येथील अधिकाऱ्यांनी लाहोरमधील त्याच्या संघटनेची पोस्टर काढण्यासही सुरवात केली असून, या संघटनेच्या मुख्यालयावरील त्यांचा झेंडा काढून त्या जागी पाकिस्तानचा झेंडा फडकाविण्यात आला आहे. हाफीजच्या समर्थकांनी लाहोर, कराची आणि इस्लामाबादसह इतर प्रमुख शहरांमध्ये मोर्चे काढत निदर्शने सुरू केली आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने मात्र आश्‍चर्यकारकरित्या सईदच्या स्थानबद्धतेचे समर्थन केले आहे. राष्ट्रीयहिताच्या नजरेतून घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असून, पुढील दोन दिवसांत आणखी चित्र स्पष्ट होईल, असे पाकिस्तानच्या लष्करातर्फे सांगण्यात आले. पाकिस्तानच्या संसदेत मात्र हाफीजच्या स्थानबद्धतेला विरोध म्हणून विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

झालेली अटक ही काश्‍मिरींच्या भारताविरोधातील लढ्याला ऊर्जा देणारी ठरेल, अशी वल्गना हाफीज सईदने आज केली. स्थानबद्ध करण्यापूर्वी त्याला पत्रकार परिषद घेण्याची परवानगी देण्यात आली होती. या वेळी तो म्हणाला, की मला ताब्यात ठेवून काश्‍मीरमधील चळवळ थांबणार नाही, उलट त्याला मोठे बळ मिळेल. मला अटक केल्याने काश्‍मीर प्रश्‍नापासून सुटका होईल, असे नरेंद्र मोदींना वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. आपल्या स्थानबद्धतेला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही तो म्हणाला.

स्थानबद्धतेचा कालावधी वाढणे शक्‍य
पाकिस्तान सरकारने हाफीज सईदसह जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत या संघटनांच्या चार म्होरक्‍यांनाही स्थानबद्ध केले. या सर्वांना 90 दिवसांसाठी स्थानबद्ध केले असले तरी आवश्‍यकतेनुसार हा कालावधी वाढविला जाण्याची शक्‍यता पाकिस्तान सरकारने व्यक्त केली आहे. तसेच, येत्या काही दिवसांत जमात उद दावा आणि इतर काही दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. सईदसह अनेक म्होरक्‍यांना पाकिस्तान सोडून जाण्यापासून रोखले जाणार आहे.

--------------------------------------------------
पाकिस्तानने सईदविरोधात अधिक कठोर कारवाई आणि दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत केले, तरच दहशतवादाविरोधातील त्यांचे प्रयत्न गंभीर आहेत असे आम्ही समजू.
- विकास स्वरूप, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय, भारत
--------------------------------------------------

Web Title: Hafiz supporters protest in Pakistan