प्रदूषणामुळे ‘हृदया’वर वाढतोय ताण

पीटीआय
Tuesday, 12 November 2019

दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब
राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचे पातळी आजही वाढलेली आढळून आली. सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी हवेतील गुणवत्तेचा निर्देशांक ३३१ नोंदला गेला. ‘सफर’ संस्थेच्या अंदाजानुसार मंगळवारी दिल्लीतील हवेतील गुणवत्ता ही गंभीर श्रेणीत पोचू शकते. दिल्लीत रविवारी एक्‍यूआयची पातळी सरासरी ३२१ राहिली होती.

बार्सिलोनाच्या ग्लोबल हेल्थचे संशोधन; मृत्युदर वाढण्यासही कारण
लंडन - विकसनशील देश विशेषत: भारतात वाढत्या प्रदूषणामुळे हृदयविकाराचा धोका असल्याचे दिसत आहे. हवेतील लहान कणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची भीती असल्याचे बार्सिलोनाच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थने प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. 

भारतासारख्या कमी आणि मध्यम उत्पन्नाच्या देशात हवेतील प्रदूषणाचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे संशोधक कॅथरिन टोनी यांनी म्हटले आहे. विकसित देशातील लोकसंख्या आणि हवेतील प्रदूषणाचे संशोधन आणि विकसनशील देशातील संशोधन यात खूप अंतर आढळून आले आहे. हृदयविकार आणि मृत्युदर वाढण्यास हवेतील प्रदूषण जबाबदार आहे, असे अहवालात म्हटले आहे. संशोधनकर्त्यांनी भारतात ज्या ठिकाणी प्रदूषण अधिक होते, अशा मध्यम उत्पन्न गटातील वास्तव्याची जागा निवडली. 

संशोधनकर्त्यांनी नागरिकांना स्वयंपाकासाठी कोणत्या प्रकारच्या इंधनाचा वापर करता, अशी विचारणा केली. त्यातील ६० टक्के नागरिकांनी बायोमॅस वापरत असल्याचे सांगितले. बायोमॅसच्या ठिकाणी सीआयएमटीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. अशा ठिकाणी हवा खेळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health stress by increase pollution