एफबीआयमुळेच मी हरले: हिलरी क्‍लिंटन

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

कॉमी यांनी आयत्या वेळी चौकशीची घोषणा केल्याने मतदारांच्या मनात निरर्थक, तथ्याचा आधार नसलेल्या शंका उत्पन्न झाल्या. यामुळेच आमच्या प्रचार मोहिमेस मोठाच फटका बसला. पुन्हा एकदा फायदा मिळविण्यासाठी आम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत धक्कादायक पराभव स्वीकाराव्या लागलेल्या डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या हिलरी क्‍लिंटन यांनी त्यांच्या पराभवाचे खापर "एफबीआय' संचालकांवर फोडले आहे. एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी यांनी निवडणुकीत केलेल्या हस्तक्षेपामुळेच आपण हरलो, असे हिलरी यांचे म्हणणे आहे.

हिलरी यांच्या परराष्ट्र मंत्री असताना त्यांना आलेल्या वा त्यांनी पाठविलेल्या इमेल्ससंदर्भात नवी चौकशी करण्याचे कॉमी यांनी मतदानाच्या ऐन तोंडावर जाहीर केले होते. यामुळेच पराभव स्वीकारावा लागल्याचे हिलरी यांनी म्हटले आहे. हिलरी या पक्षाच्या देणगीदारांशी यांसंदर्भात बोलल्याचे उघड झाले आहे.

"या निवडणुकीत यश का मिळाले नाही, या प्रश्‍नाची अनेक कारणे आहेत. परंतु कॉमी यांनी आयत्या वेळी चौकशीची घोषणा केल्याने मतदारांच्या मनात निरर्थक, तथ्याचा आधार नसलेल्या शंका उत्पन्न झाल्या. यामुळेच आमच्या प्रचार मोहिमेस मोठाच फटका बसला. पुन्हा एकदा फायदा मिळविण्यासाठी आम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले,'' असे हिलरी यांनी म्हटले आहे.

याशिवाय, कॉमी यांनी या पत्रात हिलरी यांच्याविरोधात कोणताही आरोप ठेवला जाऊ नये, अशी शिफारसही केली होती! मात्र या शिफारशीमुळे हिलरी यांना व्यवस्था वाचवित असल्याच्या ट्रम्प यांच्या आरोपाला पुष्टी मिळाल्यासारखेच झाल्याची भावना डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Hillary says momentum broke due to FBI Director