हाँगकाँग विधिमंडळाचा ‘चिनी चेहरा’ | Hong Kong | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hong Kong
हाँगकाँग विधिमंडळाचा ‘चिनी चेहरा’

हाँगकाँग विधिमंडळाचा ‘चिनी चेहरा’

हाँगकाँग : हाँगकाँगवरील चीनची (Hong Kong) पकड आणखी घट्ट झाल्याच्या घटनेवर आज शिक्कामोर्तब झाले. कोणताही लोकशाही समर्थक उमेदवार नसलेल्या निवडणूकीत (Election) विजयी झालेल्या चीनसमर्थक सदस्यांनी आज विधिमंडळात शपथ घेतली. त्याच वेळी हाँगकाँगमधील लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या ‘सिटीझन न्यूज’ या ऑनलाइन वृत्त संकेतस्थळाने (Online News Website) माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा आरोप करत आपले कामकाज बंद करत असल्याचे आज अधिकृतपणे जाहीर केले.

हाँगकाँगमध्ये निवडणूक नियमांमध्ये बदल करत चीनविरोधातील उमेदवारांना निवडणूक लढविण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत केवळ चीन समर्थक उमेदवारच उभे होते. मतदारांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळालेल्या या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना आज विधिमंडळात हाँगकाँगच्या प्रशासक कॅरी लेम यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

हेही वाचा: चंद्रपूर : चालबर्डी परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह

त्याचदरम्यान, लोकशाहीसाठी आवाज उठविणाऱ्या निवडक प्रसार माध्यमांपैकी एक असलेल्या ‘सिटीझन न्यूज’ या वृत्त संकेतस्थळाच्या मुख्य संपादक डेझी ली यांनी पत्रकार परिषद घेत उद्यापासून (ता. ४) कामकाज बंद करत असल्याचे जाहीर केले. याबाबतची पूर्वसूचना त्यांनी काल (ता. २) फेसबुकवरून दिली होती. गेल्या वर्षभरात हाँगकाँगमधील वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटनांमध्ये या दोन घटनांचाही समावेश झाला आहे.

चीनची दडपशाही कारणीभूत

चीन सरकारच्या दबावामुळे आणि दडपशाहीमुळे हाँगकाँगमधील ‘ॲपल डेली’ हे वृत्तपत्र आणि ‘स्टँड न्यूज’ हे संकेतस्थळ गेल्या काही महिन्यात बंद करावे लागले आहे. त्यात आता ‘सिटीझन न्यूझ’ची भर पडली आहे. चारच वर्षांपूर्वी वरीष्ठ पत्रकारांनी मिळून सुरु केलेल्या या वृत्त संकेतस्थळावरून राजकीय बातम्या, विश्‍लेषण आणि शोध पत्रकारितेला विशेष स्थान दिले जात होते.

हेही वाचा: पुणे : महापालिका सोमवारपासून सुरु करणार गुंठेवारीची नोंदणी

मात्र, चीनने २०१९ साली हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर माध्यम स्वातंत्र्यावर गदा येऊ लागली. या कायद्याच्या नावाखाली पोलिसांनी अनेक लोकशाहीवादी कार्यकर्त्यांची, राजकीय नेत्यांची धरपकड केली. काही दिवसांपूर्वी ‘स्टँड न्यूज’ या संकेतस्थळाच्या कार्यालयावर छापे घालत सात जणांना अटक झाल्यानंतर ‘सिटीझन न्यूज’ने कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती ‘सिटीझन न्यूज’च्या संपादक डेझी ली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsHong Kong
loading image
go to top