गलवानमध्ये चीनचे किती सैनिक मारले गेले? अमेरिकेच्या वर्तमानपत्राने केला दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 13 September 2020

जूनमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांची झटापट झाली होती. त्यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले होते, तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेले होते.

नवी दिल्ली- लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात झालेल्या झटापटीत चीनचे ६० हून अधिक सैनिक मारले गेले होते, असा दावा अमेरिकी वर्तमानपत्र न्यूज वीकने केला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये १५ जून रोजी झटापट झाली होती. हल्ल्याची योजना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आखली होती. मात्र भारताच्या आक्रमक प्रतिकारामुळे त्यांचा डाव यशस्वी झाला नाही, असे न्यूज वीकने म्हटले आहे.

WHO ने केलं पाकिस्तानचे कौतुक; इतर देशांना शिकण्याचा दिला सल्ला

या सर्व घडामोडींची सुरवात यावर्षी मे महिन्यात झाली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने सैन्य गोळा करण्यास सुरवात केली होती. लडाखमधील काही भागातील सीमेबाबत दोन्ही देशांत वाद आहे. त्यामुळे चीनचे सैन्य अनेकदा भारताच्या भूभागात घुसण्याचा प्रयत्न करते. फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसीजचे क्लिओ पास्कल यांनी याबाबत सांगितले की, तिबेटमध्ये चीनकडून सातत्याने युद्धसराव करण्यात येत आहे आणि चीन घुसखोरीच्या तयारीत आहे, अशी माहिती रशियाने भारताला दिली होती. त्यानंतर जूनमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांची झटापट झाली होती. त्यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले होते, तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेले होते. चीनच्या मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची संख्या ६०हून अधिक असल्याचा दावा अमेरिकी वर्तमानपत्राने केला आहे.

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामुळे चीन आणि भारतातील स्थिती स्फोटक बनली आहे. 15 जूननंतरही चीनच्या कुरापती थांबल्या नाहीत. चीनने तीनवेळा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैनिकांच्या सतर्कमुळे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा हा डाव हाणून पाडण्यात आला. उभय देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी सीमा भागात आपल्या सैनिकांना तैनात केले आहे. शिवाय पेंगाँगच्या दक्षिण भागातील परिसरात भारतीय सैनिकांनी ताबा मिळवला आहे. त्यामुळे चीन संतापला असून भारतीय जवानांना मागे जाण्यास सांगितलं आहे. 

अमित शहांच्या प्रकृतीबद्दल AIIMS ने दिली माहिती

चीनची दादागिरी पाहता भारतानेही चीनविरोधात आक्रमक भूमिका घेणे सुरु केले आहे. भारताने गलवानच्या घटनेनंतर चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर नुकतेच भारताने 118 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यात पबजी या प्रसिद्ध गेमचाही समावेश आहे. असे असले तरी दोन्ही देशांतील तणाव कमी व्हावा, यासाठी भारत प्रयत्न करत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनमधील त्यांच्या समपदस्थांची मॉस्कोमध्ये भेट घेतली होती. तसेच दोन्ही देशातील संबंध सुरळीत होण्यासाठी चर्चा केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many Chinese soldiers were killed in Galwan The American newspaper claimed