पाकमध्ये दर्ग्यातील स्फोटात 100 ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

अमाक न्यूज एजन्सीच्या माध्यमातून 'इसिस'ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दर्ग्यामध्ये दर गुरुवारी "धमाल' कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊनच हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कराची : सिंध प्रांतातील सेहवान येथे सुफी लाल शाहबाज कलंदर दर्ग्यात आज रात्री 'इसिस'च्या आत्मघातकी दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात किमान 100 जण ठार, तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत. सिंध प्रांतात गेल्या आठवडाभरात झालेला हा पाचवा हल्ला आहे.

दर्ग्याच्या सुवर्णद्वारातून हल्लेखोर आत घुसला होता. सुफी नृत्याचा 'धमाल' हा कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी त्याने स्वतःला उडवून दिले. त्या वेळी शेकडो नागरिक दर्ग्यात उपस्थित होते. हल्लेखोराने पहिल्यांदा हातबॉंब फेकले होते. परंतु, ते फुटले नाहीत, नंतर त्याने स्वतःला उडवून दिले, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक जमशोरो तारिक विलायत यांनी सांगितले. मृतांमध्ये महिला व मुलांची संख्या लक्षणीय आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

तालुका हॉस्पिटलचे अधिष्ठाता मोईनुद्दीन सिद्दिकी यांच्या हवाल्याने 'डॉन' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार किमान 60 जणांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
हल्ल्याचे ठिकाण हैदराबादपासून 130 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात असल्याने तेथे रुग्णवाहिका आणि इतर वैद्यकीय सुविधा तातडीने पोचण्यात अडचणी आल्याचे हैदराबादचे पोलिस आयुक्त काझी शहीद यांनी सांगितले. स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना इतर रुग्णालयांत हलविण्यासाठी सिंधचे मुख्यमंत्री सईद मुराद अली शाह यांनी लष्कराला मदतीची विनंती केली आहे.

दहशतवाद्यांनी गेल्या सोमवारी पंजाब असेंब्लीच्या बाहेर केलेल्या हल्ल्यात 14 जण ठार झाले होते. त्याच दिवशी क्वेट्टा येथे बॉंब निकामी करणाऱ्या पथकातील दोन अधिकारी स्फोटात ठार झाले होते. दहशतवाद्यांच्या मुसक्‍या आवळण्याची भाषा पाकिस्तानने कालच केली होती. त्या पार्श्‍वभूमीवरच हा हल्ला करण्यात आला आहे. देशभरातील सुफी दर्गे 2005पासून दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहेत.

Web Title: hundred dead in blast at a dargah in pakistan