नवाझ शरीफ पुत्राचे इम्रानना आव्हान;कथित सरकारने भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत

नवाझ शरीफ पुत्राचे इम्रानना आव्हान;कथित सरकारने भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत

लंडन - पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा मुलगा हुसैन याने इम्रान सरकारला खुले आव्हान दिले आहे. शरीफ कुटुंबीयांच्या कथित भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कामांचे पुरावे ब्रिटन किंवा जगातील कोणत्याही देशातील सरकारसमोर सादर करावेत असे वक्तव्य त्यांनी केले.

हुसैन यांनी जिओ न्यूज या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी एका खटल्यातील निकालाचा संदर्भ दिला आहे. सर अँथनी इव्हान यांनी ब्रॉडशीट एलएलसी विरुद्ध पाकिस्तान सरकार तसेच राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोग यांच्यातील खटल्यावर निकाल दिला. ब्रॉडशीटने शरीफ कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी मॅट्रीक्स रिसर्च कंपनीची नेमणूक केली, पण त्यात त्यांना काहीही बेकायदेशीर आढळून आले नाही. त्यांची क्लीन चीटच दिली आहे, असे हुसैन यांनी सांगितले.

परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीत पाकिस्तानी नागरिकांच्या परदेशांमधील गुप्त मालमत्तांचा शोध लावण्यासाठी राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोगाने कार्यवाही सुरु केली. त्यासाठी ब्रिटनजवळील आईल बेटावरील ब्रॉडशीट कंपनीशी करार करण्यात आला होता. 2003 मध्ये तो रद्द करण्यात आला. या प्रकरणामुळे पाकिस्तानला भ्रष्टाचाराने ग्रासल्याचेच अगदी उघड झाले. मुख्य म्हणजे भ्रष्ट व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी याचा राजकीय स्वार्थासाठी वापर झाला. त्यानंतर भ्रष्ट व्यक्तींना उत्तरदायित्वापासून मोकळीक मिळावी म्हणून राष्ट्रीय सलोखा अध्यादेशच जारी करण्यात आला.

हुसैन यांनी आणखी एक तपशील दिला. संयुक्त चौकशी पथकाच्या अहवालातून शरीफ कुटुंबियांच्याबाबतीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांबाबत स्ट्रोझ फ्रेडबर्ग कंपनीने न्यायवैद्यक अहवाल सादर केला होता. त्याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोगाने एफटीआय कन्सल्टींगच्या मार्क बेझंट आणि यासीर दाजानी यांची नियुक्ती केली होती. 

बेझंट यांचे पुरावे शरीफ कुटुंबीयांच्या मालमत्ता निश्चीत करणे आणि त्यांचे बाजार मूल्य ठरविणे एवढ्यापुरतेच मर्यादित होते. त्यातही काही आक्षेप नव्हते, अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केल्या जाणाऱ्या खोट्या आरोपांवर परदेशांमधील सरकारे विश्वास ठेवत नाहीत. मुख्य म्हणजे इम्रान यांचे मंत्री आणि त्यांचे मित्रच भ्रष्टाचारात सामील आहेत, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारेच उत्तरदायित्व लागू नाही. 
- हुसैन शरीफ

जलसंधारण मंत्र्याचे उदाहरण
हुसैन यांनी इम्रान यांच्या मंत्रिमंडळातील जलसंधारण मंत्री फैजल वावदा यांचे उदाहरण दिले. त्यांच्या लंडनमध्ये १९ मालमत्ता असून हा तपशील त्यांना दडवून ठेवला आहे. फैजल यांनी कराची पश्चिम मतदारसंघातून हुसैन यांचे काका आणि नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाझ यांचा पराभव केला होता. निवडणूक निकालानंतर त्यांच्याविरुद्ध सिंध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांना परदेशातील बँकांमधील खाती आणि मालमत्तांचा तपशील जाहीर केला नसल्याचा दावा याद्वारे करण्यात आला होता. वावदा यांची जीवनशैली काही वेळा वादाचा विषय ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com