
युद्धभूमीवर पडल्या अक्षता! भारतीय तरुणाने युक्रेनियन तरुणीसोबत केलं लग्न
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. एकीकडे लोक जीवाची बाजी लावून सुटका करुन घ्यायच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे एका भारतीय तरुणाने युक्रेनियन तरुणीशी लग्न केलंय. या जोडप्याने युद्धाच्या पूर्वसंध्येलाच 23 फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये लग्न केलंय. या लग्नावेळी युक्रनेमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती टीपेला पोहोचली होती. मात्र, त्यांचा विवाह शांततेत पार पडला. त्यानंतर ते भारतात आले. या नवविवाहित जोडप्याने 27 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये जवळचे मित्र आणि आपल्या कुटुंबासह रिसेप्शन करुन हा आनंदसोहळा साजरा केला.

Wedding in Ukraine
यावेळी या दोघांनीही युद्धातून सहिसलामत वाचून आपल्या देशात वेळेत सुरक्षित परतल्याचा आनंद व्यक्त केला आहे. या समारंभाला उपस्थित असलेल्यांनी म्हटलंय की, प्रतीक आणि ल्युबोव्ह या जोडप्याने 23 फेब्रुवारीला युक्रेनमध्ये लग्न केलं होतं आणि रिसेप्शनसाठी ते भारतात परतले. प्रत्यक्षात युद्ध 24 फेब्रुवारीला सुरु झालं आणि सुदैवाने युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस आधी ते हैदराबादमध्ये आले. (Hyderabad man ties the knot with Ukrainian girl during Russia Ukraine invasion)
"युक्रेनमध्ये तणावाचं वातावरण असल्यामुळे, हे रिसेप्शन केवळ निवडक नातेवाईक आणि जवळच्या संबंधित असलेल्या लोकांसोबत करण्यात आले." चिलकुर बालाजी मंदिराचे वंशपरंपरागत अर्चका रंगराजन यांनी ही माहिती दिली आहे. (Russia-Ukraine crisis)
या जोडप्यानं एकमेकांना हार घालून पारंपरिक पद्धतीने सगळ्या धार्मिक विधी पूर्ण केल्या. मीडियाने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी बोलणे टाळले. त्यांच्या घरचे म्हणाले की अशा वेळी जोडप्याला एकांत देणे गरजेचे आहे. दुर्दैवाने दोघांना लवकरच युक्रेनला परत जावे लागणार आहे, कारण त्यांच्या व्हिझाची वैधता आणखी काही आठवडेच राहिली आहे.
दरम्यान, युद्ध लवकर संपावे यासाठी चिलकूर बालाजी मंदिरात दररोज विशेष पूजा केली जात आहे. "युक्रेनवरील रशियाचं आक्रमण थांबावं आणि शांतता पुन्हा प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. या युद्धाने जगभरात रक्तपात आणि अशांतता आणली आहे. या महामारीने आधीच त्रस्त असलेले जग आणखी उद्ध्वस्त केले आहे," असं रंगराजन यांनी म्हटलंय. युक्रेनमध्ये 20,000 भारतीय नागरिक होते, त्यापैकी बहुतेक मेडीकलचे विद्यार्थी होते. या झपाट्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये भारत सरकार आपल्या नागरिकांना परत आणायचे काम करत आहे.