कुलभूषण जाधव यांच्याबाबतचा निर्णय उद्या

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

जाधव यांना गेल्या वर्षी तीन मार्चला पाकिस्तानने अटक केली होती. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप ठेवत फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. याविरोधात भारताने आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात ठामपणे आपली बाजू मांडली.

हेग - भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत भारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) उद्या (गुरुवार) निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

कुलभूषण जाधव यांच्या खटल्यातील निकाल देण्यापूर्वीच त्यांना पाकिस्तानकडून फाशी दिली जाण्याची भीती आहे. ही शिक्षा रद्द करण्यात यावी,'' अशी विनंती भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली होती. जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. आपली लंगडी बाजू मांडताना दमछाक झालेल्या पाकिस्तानने सर्व आरोप फेटाळले असले, तरी भरकटलेली मांडणी केल्याने त्यांनी स्वत:ची नाचक्की ओढवून घेतली होती. दरम्यान, या प्रकरणाच्या निकालाचा दिवस ठरला असून, उद्या दुपारी साडेतीन वाजता निकाल सुनाविण्यात येणार आहे.

जाधव यांना गेल्या वर्षी तीन मार्चला पाकिस्तानने अटक केली होती. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप ठेवत फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. याविरोधात भारताने आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात ठामपणे आपली बाजू मांडली. या प्रकरणाने अत्यंत गंभीर वळण घेतले असल्याने या न्यायालयात तातडीने दाद मागावी लागल्याचे भारताने सांगितले. भारतातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी प्रामुख्याने बाजू मांडली. 

पाकने उगाळले जुनेच मुद्दे 
भारताने आपली बाजू प्रभावीपणे मांडली असताना पाकिस्तानची मात्र चांगलीच दमछाक झाली. आपली बाजू मांडण्यासाठी दिलेल्या दीड तास वेळेचाही त्यांना पूर्ण वापर करता आला नाही. आपल्यावरील सर्व आरोप फेटाळताना पाकिस्तानच्या वकिलांनी सुरवातीलाच आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण आणण्याची गरज नसल्याचे सांगितले. कोणताच मुद्दा ठामपणे न मांडता पाकिस्तानने "दहशतवादाला थारा देणार नाही,' "शेजाऱ्यांकडून होणारा त्रास' असे मुद्दे उगाळले. 

भारताने मांडलेले मुद्दे 
- जाधव यांना इराणमधून पाकिस्तानात पळवून आणून खटला चालविला. 
- जाधव यांच्याविरोधात सुनावणीचा फार्स, वकील न देऊन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने न्यायप्रक्रियेचा अनादर केला 
- खोट्या आरोपांखाली पाकिस्तानमध्ये गेल्या एक वर्षापासून अधिक काळ अटकेत असलेल्या निरपराध भारतीय नागरिकाला व्हिएन्ना करारानुसार दिले जाणारे कोणतेही अधिकार आणि संरक्षण दिले नाही. संपर्काचाही अधिकार हिरावून घेतला. 
- जाधव यांना वकील देण्याची भारताची विनंती पाकिस्तानने वारंवार फेटाळली आणि सुनावणीची कागदपत्रेही भारताला दिली नाहीत 
- मूलभूत मानवी हक्कांची पाकिस्तानकडून पायमल्ली 
- पाकिस्तान लष्कराच्या तुरुंगात असताना जाधव यांच्याकडून बळजबरीने जबाब नोंदवून त्या आधारावर आरोप ठेवले. 
- जाधव यांना फाशी दिल्यास पाकिस्तानवर युद्धगुन्हेगारीचा आरोप ठेवावा लागेल. 
- जाधव यांच्या कुटुंबीयांनी केलेला व्हिसाचा अर्ज पाकिस्तानकडे अद्यापही प्रलंबित. 

पाकिस्तानने मांडलेले मुद्दे 
- जाधव यांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्याची गरजच नव्हती 
- जाधव यांच्या पासपोर्टबाबत भारताचे स्पष्टीकरण नाही 
- भारताची याचिका रद्द करावी 
- वकील न देण्याचा निर्णय कायद्यानुसारच 
- जाधव यांना अपिलासाठी दीडशे दिवस दिले होते. 
- या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाला हक्क नाही 
- जाधव यांच्या आरोपांबाबत भारताकडून स्पष्टीकरण नाही. 
- भारताचे सर्व आरोप चुकीचे 

Web Title: ICJ Verdict on Kulbhushan Jadhav Case at 3:30 pm on Thursday