esakal | ‘टू प्लस टू’मध्ये अफगाण केंद्रस्थानी
sakal

बोलून बातमी शोधा

‘टू प्लस टू’मध्ये अफगाण केंद्रस्थानी

‘टू प्लस टू’मध्ये अफगाण केंद्रस्थानी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : तालिबानच्या वर्चस्वानंतर अफगाणिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू बनू नये या भारताच्या चिंतेवर ब्रिक्स देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा पाठिंबा मिळविल्यानंतर भारताने ‘क्वाड’मधील महत्त्वाचा साथीदार देश ऑस्ट्रेलियासोबतच पहिल्या ‘टू प्लस टू’ संवादांतर्गत अफगाणिस्तानवर चर्चा केली. अर्थात, चीनी वर्चस्ववादाचा उपद्रव पाहता प्रादेशिक सुरक्षा, भारत प्रशांत क्षेत्राची प्रगती हे देखील चर्चेचे विषय होते.

चीन विरोधातील आघाडी मानली जाणाऱ्या क्वाडच्या निमित्ताने जवळीक वाढलेल्या ऑस्ट्रेलियाशी पहिला ‘टू प्लस टू’ संवादाअंतर्गत आज वाटाघाटी झाल्या. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मॅरीस पेन आणि संरक्षणमंत्री पीटर डॅटन यांच्याशी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी चर्चा केली. चीनचा वाढता प्रभाव त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमधील विद्यमान स्थिती हा दोन्ही देशांच्या चिंतेचा समान मुद्दा आहे. त्याचा दाखला परराष्ट्र मंत्री जयशंकर आपल्या प्रारंभिक वक्तव्यातून दिला.

ते म्हणाले, की अतिशय महत्त्वाच्या वेळी या वाटाघाटी होत आहेत. कोरोनासोबतच राजनैतिक वातावरणातही वेगाने बदल होतो आहे. त्यामुळे द्विपक्षीय पातळीवर तसेच समान हित असलेल्या मित्रांसोबत आपल्या राष्ट्रीय हितांसाठी, त्याचप्रमाणे स्थिर, शांत आणि प्रगतशील भारत-प्रशांत क्षेत्रासाठी योग्य ती पावले उचलावी लागतील. भारताचा अशा प्रकारचा ‘टू प्लस टू ’संवाद मोजक्याच देशांशी होत असल्याचेही जयशंकर यांनी यावेळी नमूद केले. तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विटद्वारे देखील ऑस्ट्रेलियाशी ‘टू प्लस टू’ संवादामध्ये अफगाणिस्तान हा महत्त्वाचा विषय असेल असे स्पष्ट केले होते.

या वाटाघाटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी हा ‘टू प्लस टू’ संवाद भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची व्यापक सामरिक भागीदारी अधोरेखित करणारा असल्याचे दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनातून स्पष्ट केले. तसेच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, संसर्गाचा मुकाबला यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील सहकार्यावर दोन्ही देशांचा भर असेल, असेही स्पष्ट केले. मलाबार या नौदलाच्या युद्ध सरावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या नियमित सहभागाबद्दलही समाधान व्यक्त केले.

‘टू प्लस टू’ संवादाचे ठळक मुद्दे

  • द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा

  • अफगाणिस्तान, भारत-प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा, बहुपक्षीय व्यासपीठावर सहकार्य

  • शाश्वत आर्थिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालनातून मुक्त व्यापारावर भर

  • भारताच्या संरक्षण क्षेत्रातील उद्योगांमध्ये ऑस्ट्रेलियाला सहभागाचे आवाहन

loading image
go to top