भारत-चीन तणाव : लष्करी पातळीवर आठव्या बैठकीत दोन्ही देशांनी एकमेकांसमोर ठेवल्या 'या' मागण्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

याआधी सात बैठका दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या असल्या तरीही त्या अयशस्वी ठरल्या आहेत.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सीमेवर सध्या अत्यंत तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर तैनात असून ऐन थंडीत ते आमनेसामने उभे ठाकले आहेत. सीमेवर सुरु असलेल्या या तणावाच्या परिस्थितीला निवळण्यासाठी म्हणून दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा सुरु आहेत. लष्करी पातळीवर या चर्चा सध्या सुरु आहेत. ही चर्चेची आठवी फेरी आहे. याआधी सात बैठका दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या असल्या तरीही त्या अयशस्वी ठरल्या आहेत. आज शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता ही बैठक सुरु झाली आहे. 

हेही वाचा - 'पुतीन देऊ शकतात राजीनामा; गंभीर आजाराशी सुरू आहे झुंज'
चर्चेची ही आठवी फेरी सध्या लडाखमधील चुशूलमध्ये होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चर्चेत भारताने चीनच्या समोर  पुन्हा  एकदा आधीच्या परिस्थितीत जाण्याची मागणी केली आहे. भारताचं म्हणणं आहे की, चीनने आपल्या सैनिकांना मेच्या आधी असलेल्या ठिकाणीच पुन्हा एकदा तैनात करावं. तणावाची परिस्थिती होण्याआधी दोन्ही सैन्य जिथे तैनात  होते, तिथेच पुन्हा जावं. तर चीनचं म्हणणं आहे की, भारताने आधी पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातून आपले सैन्य हटवावं. 

वास्तविकत: भारताने पँगाँग सरोवराच्या या भागावर रणनीती म्हणून ताबा घेतला होता. तर चीनच्या सैन्याने भारताच्या सैन्याला फिंगर 4 च्या पुढे पेट्रोलिंग करु दिलं नाही. 
12 ऑक्टोबर रोजी चर्चेची सातवी फेरी झाली होती. या चर्चेत चीनने अंशत: मागे हटण्याचा प्रस्ताव भारतासमोर ठेवला होता. भारताने या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला होता. 

हेही वाचा - US Election : 'कंट्रोल डोनाल्ड, कंट्रोल'; ग्रेटाने उडवली खिल्ली; ट्रम्प यांच्या स्टाईलनेच दिले सडेतोड उत्तर
मे महिन्याच्या आधीपासूनच पूर्व लडाखच्या भागात दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर आहेत. दोन्ही देशांच्या दरम्यान सुरु असलेल्या या तणावाला आता सात महिने पूर्ण झाले आहेत. यादरम्यान हे प्रकरण शांततेने सुटावं म्हणून चर्चेच्या बैठकादेखील करण्यात आल्या आहेत. मागे लष्करी पातळीवर चर्चेच्या सात बैठका होऊनही या समस्येवर अद्याप तोडगा निघू शकला नाहीये. आता आज चर्चेची ही आठवी फेरी सुरु आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांना समाधानकारक असा काही निर्णय होतोय का हे पाहणं निर्णायक ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china border conflict 8th phase talks on ladakh border