लडाख मुद्यावर भारत-चीन यांच्यात बैठक; LAC वरून सैन्य मागे घेण्यावर सहमती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेलं तणावाचं वातावरण कमी कऱण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी पुन्हा चर्चा झाली आहे.

नवी दिल्ली - लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेलं तणावाचं वातावरण कमी कऱण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी पुन्हा चर्चा झाली आहे. वर्किंग मेकॅनिजम फॉर कन्सल्टेशन अँड कॉर्डिनेशन ऑन इंडिया चीन बॉर्डर अंतर्ग होणाऱ्या या बैठकीमध्ये परराष्ट्र आणि संरक्षण खात्यातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटलं की, दोन्ही पक्षांनी सध्याच्या परिस्थितीवर सखोल विचार केला आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य पूर्णपणे मागे घेण्यासाठी दोन्ही देश गांभीर्याने काम करतील यावर एकमत झालं. 

दोन्ही देशांनी हा विश्वास दर्शवला की, सीमेवर शांती प्रस्थापित करणं चांगल्या द्वीपक्षीय संबंधासाठी गरजेचं आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याचा वावर कमी करण्यासाठी तसंच दोन्ही देशांच्या पातळीवर संवाद सुरु ठेवला जाईल यासाठी भारत आणि चीनने तयारी दर्शवली आहे. मात्र अद्याप चीन देपसांग आणि पैगोंगमधून त्यांचे सैनिक मागे घेण्यास तयार झालेला नाही. 

चीनचे सैनिक एप्रिल 2020 च्या आधी जिथं होते तिथं जावेत असं भारताचं म्हणणं आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे महिन्यात झालेल्या घटनेनंतर त्यासंदर्भात ही चौथी बैठक होती. याआधीची बैठक 24 जुलैला झाली होती. पाचवेळा कोर कमांडर पातळीवर ही चर्चा झाली आहे. यनंतरही दोन्ही देशांच्या सैनिकांमधील तणाव कायम आहे. वाद कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना आात नैसर्गिक संकट उभा राहणार आहे. थंडी वाढत जाणा असून सैनिकांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. तरीही कोणीच मागे हटण्यास तयार नाही. 

हे वाचा - रशियात पुतीन यांचा कट्टर विरोधक रुग्णालयात दाखल; विषप्रयोग झाल्याचा संशय

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आठवड्याच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत दोन्ही देशांमध्ये स्पष्ट आणि सखोल चर्चा झाली. दोन्ही पक्षांमध्ये ऑनलाइन चर्चा झाली. प्रवक्त्यांनी सांगितलं की, दोन्ही पक्षांनी सीमाभागात विकासासाठी शांतता असणं गरजेचं आहे यावर सहमती दर्शवली. पश्चिम सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिक पूर्णपणे मागे हटण्यासाठी काम करणार आहेत. दोन्ही देशांचे मंत्री आणि विशेष प्रतिनिधी यांनीही यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china both agreed to resolve issues over LAC