भारत-चीन वाद चिघळल्यास हस्तक्षेप करणार का? रशिया म्हणतो...

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 September 2020

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी रशियाने भारत आणि चीन वादावर भाष्य केलं आहे.

मॉस्को- भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी रशियाने भारत आणि चीन वादावर भाष्य केलं आहे. उभय देशांमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचं रशियाने म्हटलं आहे. तसेच भारत आणि चीनमध्ये होणाऱ्या चर्चेमध्ये सामील नसल्याचंही रशियाने स्पष्ट केलं आहे. 

भारतातील रशियाचे उपराजदूत रोमन बाबूश्किन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आम्ही भारत आणि चीनला चर्चेसाठी प्रोत्साहित करत आहोत. पण, आम्ही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय मुद्यावर हस्तक्षेप करणार नाही. जोपर्यंत दोन्ही देश आम्हाला सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करणार नाही. तसेच दोन्ही देशात सध्या सुरु असलेल्या कसल्याही चर्चेमध्ये आम्ही सहभागी नसल्याचे बाबूश्किन यांनी स्पष्ट केलं. ब्रिक्स, शांघाई सहयोग संघटनेसारख्या संघटनांमध्ये द्विपक्षीय मुद्दा सर्वसामान्य सहमतीनेच आणला जाईल, असंही ते म्हणाले.

भारतीय माध्यमांनीही 'ग्लोबल' झालं पाहिजे- पंतप्रधान मोदी

काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह रशियात गेले होते

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी रशियाला भेट दिली होती, त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा मॉस्को दौरा होणार आहे. सिंग एससीओच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियात गेले होते. विशेष म्हणजे शुक्रवारी राजनाथ सिंह आणि चीनमधील त्यांचे समपदस्थ वेई फेंगही यांच्यामध्ये लडाखमुद्द्यावरुन जवळजवळ दोन तास चर्चा झाल्याचे सांगितले जाते. यावेळी सिंग यांनी चीनला खडेबोल सुनावले होते. भारत एक इंचही आपली जमीन सोडणार नाही. तसेच कोणत्याही परिस्थितीत भारत आपली अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी कठीबद्ध आहे, असं त्यांनी चीनला सुनावलं होतं.

भारतामध्ये सुरु झालेल्या तणावानंतर दोन्ही देशांच्या उच्चपदस्थ नेत्यांची ही पहिली आमनेसामने भेट होती. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी वांग आणि जयशंकर यांच्या द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, चीन आणि भारतामध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्याच्या परिसरातील भारतीय जवान चीनच्या हद्दीत घुसले. त्यांनी गस्त घालणाऱ्या चिनी सैन्यांकडे पाहून हवेत गोळीबार केला, असा दावा चीनकडून करण्यात आला होता. हा दावा भारतीय लष्कराने खोडून काढला. चिनी सैन्यानेच हवेत गोळीबार करुन ते भारतावर आरोप करत आहेत, असे स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिले. चीनकडून सातत्याने सामंजस्य कराराचे उल्लंघन होत असल्याचेही भारतीय लष्कराने म्हटले आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in india china conflict russia will meditate