भारताने उतरवला पाकचा मुखवटा; पुन्हा पाडलं तोंडघशी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 25 August 2020

दहशतवादाचा सर्वांत मोठा पुरस्कर्ता देशच दहशतवादाचा बळी म्हणवून मुखवटा धारण करत आहे, अशी टीका करत भारताने पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला आहे.

न्यूयॉर्क- दहशतवादाचा सर्वांत मोठा पुरस्कर्ता देशच दहशतवादाचा बळी म्हणवून मुखवटा धारण करत आहे, अशी टीका करत भारताने पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला आहे. पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रांमधील राजदूताने सुरक्षा परिषदेत निवेदन दिल्याच्या दाव्यानंतर भारताने ही टीका केली आहे.

दहशतवादासंबंधीच्या एका चर्चेवर पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी सुरक्षा परिषदेत निवेदन दिल्याचा खोटा दावा पाकिस्तानच्या दूतावासाने केला होता. संबंधित चर्चेत सुरक्षा परिषदेचे सदस्य नसलेल्यांना प्रवेश नसतो आणि पाकिस्तान या परिषदेचा सदस्य नाही. या चर्चेच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रात सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्य देशांचे प्रतिनिधी दिसत आहेत. ‘सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला परवानगीच नसताना त्यांच्या प्रतिनिधीने कुढे निवेदन दिले हे समजत नाही. पाकिस्तानची पाच खोटी विधाने उघड झाली आहेत,’ असे भारतीय दूतावासाने ट्वीटरवर सांगितले. 

पाकिस्तान स्वत:ला दहशतवादाचा बळी म्हणवतो, पण त्यांनी शंभर वेळा जरी हे खोटे सांगितले तरी ते सत्य ठरणार नाही. भारताविरोधात दहशतवादाचा जोरदार पुरस्कार करणारा हा देश दहशतवादाचा बळी म्हणून मुखवटा धारण करत आहे,’ अशी टीका भारतीय दूतावासाने ट्वीटरवरून केली आहे.

कोरोना संसर्गाची दुसऱ्यांदा बाधा शक्य; पुरावा मिळाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा 

पाकिस्तानमधून अल कायदा संघटनेला आम्ही नष्ट केले, या मुनीर अक्रम यांच्या विधानाची भारताने पोलखोल केली आहे. पाकिस्तानच्या राजदूतांना कदाचित माहिती नसेल की ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपून बसला होता आणि अमेरिकेने पाकिस्तानात जाऊन त्याला मारले तसेच, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संसदेतच ओसामाला ‘हुतात्मा’ असे म्हटले होते आणि देशात चाळीस ते पन्नास हजार दहशतवादी असल्याचे त्यांनीच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सांगितले होते, असे भारताने निदर्शनास आणून दिले. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची संख्या तीन टक्क्यांवर खाली आली असताना, ते भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत आहेत, असेही भारताने सुनावले.

पाकिस्तानची खोटी विधाने

- सुरक्षा परिषदेत दहशतवादाबाबत निवेदन दिले
- पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी भारताने भाडोत्री दहशतवादी पाठविले.
- संयुक्त राष्ट्राने तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या काळ्यात यादीत भारतीयांची नावे
- भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार
- पाकिस्तानातून दहशतवाद नष्ट

भारताने केलेली टीका

- पाकिस्तानचा दावाही हास्यास्पद.
- पाकिस्तानमुळे जगाचे मोठे नुकसान
- काळ्या यादीतील अनेक दहशतवाद्यांचे पाकिस्तान हेच आश्रयस्थान
- अनेक दहशतवादी गटांचे म्होरके पाकिस्तानी नागरिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India criticize Pakistani on Statements made