भांडखोर चीनची गुर्मी झाली कमी; म्हणतो, 'भारताला आम्ही शत्रू मानत नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 15 September 2020

गलवान खोऱ्यात उभय देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या संघर्षापासून परिस्थिती स्फोटक बनली आहे.

बिजिंग- भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. गलवान खोऱ्यात उभय देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या संघर्षापासून परिस्थिती स्फोटक बनली आहे. दोन्ही देशांनी आपल्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिकांची तैनाती केली आहे. असे असताना चीनने आता आपली भाषा मवाळ केल्याचं दिसत आहे. कारण चीनच्या सरकारी वृत्तपत्राने भारत आमचा शत्रू नसल्याचं म्हटलं आहे.

चीनला झटका देत संयुक्त राष्ट्रात भारताने मारली बाजी; 'ECOSOC'चं...

भारतासंबंधी चीनच्या नीतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आम्ही भारताला एका शत्रूच्या रुपात पाहात नाही. द्विपक्षीय संबंध स्थिर आणि मजबूत करण्यासाठी आम्ही भारतासोबत सहयोग करण्यासाठी तयार आहोत. पूर्वीची स्थिती प्राप्त होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांची भेट घ्यायला हवी, तसेच चर्चा करायला हवी, असं चीनच्या सरकारची ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रात म्हटलं आहे. 

ग्लोबल टाईम्स हे चिनी सरकारचे मुखपत्र आहे. आता या वृत्तपत्राने शांतीची भाषा सुरु केली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी या वृत्तपत्राच्या संपादकाने भारताला युद्धाची धमकी दिली होती. चीनसोबत युद्ध झाल्यास भारताचा नक्कीच पराभव होईल, असं संपादकाने म्हटलं होतं. भारताकडे कमी संसाधने आहेत. भारताचे जवान शक्तीशाली नाहीत. त्यांचा थंडी किंवा कोरोना विषाणूमुळे मृत्यू होईल. भारत हिवाळ्यात मागे हटला नाही, तर चीन उत्तर देण्यास तयार आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. रशियामध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये बैठक होत असताना हे वक्तव्य आलं होतं. 

सोमवारी चीनची भाषा मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं. भारतातील चीनच्या राजदुतांनी वाद मिटवण्यासाठी मार्ग काढण्यात येईल, असं म्हटलं. ते म्हणाले की, 'चीनचे स्टेट काऊंसलर आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यामध्ये एकमत, संवाद आणि चर्चा व्यवस्थित पार पडली आणि सीमेवरील सैनिकांनी याचे योग्य पालन केले, तर वाद निवळण्यासाठी आपण नक्की मार्ग काढू'

जगातील 8 असे देश ज्यांच्या सीमा आहेत अभेद्य!

दरम्यान, १५ जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झडप झाली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनचीही हानी झाली होती, मात्र याबाबतची माहिती देण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून उभय देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. दोन्ही देशांनी सीमा भागात मोठा फौजफाटा तैनात केलाय. चीनने या काळात दोनदा 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वातावरण आणखी तापलं आहे. यात भारताने दक्षिण पेंगॉंग तलावाच्या परिसरात ताबा मिळवला असल्याने, चीनचा तिळपापड झाला आहे.  दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी स्तरावर चर्चा सुरु आहे. पण, याला यश येताना दिसत नाही. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india is not our enemy said china global times