esakal | भारत हा सुरक्षा पुरविणारा देश : भारताचे राजदूत
sakal

बोलून बातमी शोधा

taranjitsingh sandhu

भारत हा सुरक्षा पुरविणारा देश : भारताचे राजदूत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : व्यूहात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हिंदी महासागर क्षेत्रात भारत स्वत:ला सुरक्षा पुरविणारा देश म्हणून पाहतो, असे प्रतिपादन भारताचे अमेरिकेतील राजदूत तरनजितसिंग संधू यांनी आज केले. या क्षेत्रात भारत आपल्या मित्र देशांना आणि भागीदारांसाठी सागरी सुरक्षा आणि आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी मदत करतो, असे संधू यांनी सांगितले.

येथे एका कार्यक्रमात बोलताना संधू म्हणाले की, ‘‘हिंदी महासागर हा भारतासाठी शेजारी आणि मित्रदेशांना जोडणारा दुवा आहे. जगासमोर सध्या असलेल्या आव्हानांचा सामना करणे एकट्या-दुकट्या देशाला शक्य नाही. एकमेकांवरील अवलंबित्व हे आमच्या दृष्टीने कमकुवतपणाचे नाही तर, सामर्थ्याच्या स्रोताचे लक्षण आहे.

आम्हाला अशा मैत्रीचे आणि परस्पर विश्‍वासाचे महत्त्व वाटते. अनेकांशी संपर्क असणे हा अनेक समस्यांमधून तोडगा काढण्याचा मार्ग असू शकतो. जो समुद्र आपल्याला विलग करतो, तोच संपर्काचेही माध्यम ठरतो. हिंदी महासागर क्षेत्रात भारत स्वत:ला सुरक्षा पुरविणारा देश मानतो. या भागात कोणत्याही मदतीची आवश्‍यकता भासल्यास भारताकडून पहिला प्रतिसाद मिळतो.’’

भारत-प्रशांत क्षेत्राबाबतही संधू यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. या क्षेत्रातील देशांबरोबर भारताचे संबंध अत्यंत दृढ आहेत. या प्रदेशात सर्वांना खुला प्रवेश असल्याचे आम्ही मानतो, असे संधू यांनी सांगितले.

loading image
go to top