भारताची पाकला चपराक; UN मध्ये पुन्हा काश्मीर मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

संयुक्त राष्ट्राला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पाकिस्तानने पुन्हा जम्मू काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. 

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्राला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पाकिस्तानने पुन्हा जम्मू काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांना भारताने जबरदस्त चपराक लगावली. भारताने पाकिस्तानला दहशतवाद्यांचा किल्ला म्हटलं आहे. भारताने म्हटलं की, पाकिस्तान एक असा देश आहे जिथं दहशतवाद पसरवण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यांना हुतात्म्यांचा दर्जा दिला जातो. 

दहशतवादाला खतपाणी घालत असल्यावरून पाकिस्तानला भारताने घेरताना तिथल्या इतर परिस्थितीवरही वक्तव्य केलं. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत चालला आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैसी यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देण्याच्या अधिकारांतर्गत भारताने दहशतवादाचा मुद्दा उचलला. संयुक्त राष्ट्रातील सचिव विदिशा मैत्रा यांनी कुरैशी यांचं भाषण म्हणजे भारताच्या अंतर्गत मुद्यांवर पाकिस्तानने रचलेली कथा असल्याचं म्हटलं आहे.

सोमवारपासून संयुक्त राष्ट्राच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पाकिस्तानने काश्मीरबाबत वक्तव्य केल्यानंतर भारताच्या विदिशा मैत्रा यांनी उत्तर देण्याच्या अधिकारांतर्गत पाकिस्तानने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर द्यायचं असल्याचं म्हटलं. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान वारंवार या व्यासपीठावरून खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे प्रतिनिधी जे काही बोलले ते त्यांनी स्वत:च रचलेली एक कथा आहे. भारताच्या अंतर्गंत बाबींवर त्यांच्या मनाने वाट्टेल तसं बोलणं न संपणारं आहे. 

हे वाचा - इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; सरकार पाडण्यासाठी विरोधक एकत्र

मैत्रा यांनी म्हटलं की, भारत कुरैशी यांच्या जम्मू काश्मीरबाबतच्या वक्तव्याला फेटाळून लावत आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. जर संयुक्त राष्ट्रात आतापर्यंत कोणता अजेंडा पूर्ण झाला नसेल तर तो आहे वाढता दहशतवाद थांबवणं. पाकिस्तान एक असा देश आहे जो पूर्ण जगभरात दहशतवादाचं केंद्र म्हणून कुख्यात आहे. पाकिस्तानने स्वत:हून दहशतवाद्यांना आश्रय देणं, प्रशिक्षण देणं आणि त्यांना हुतात्मा दर्जा दिल्याचा स्वीकार केला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानात अल्पसंख्यांकावर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात असल्याचंही मैत्रा यांनी म्हटलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india slam pak in un over raise kashmir issue