भारत-अमेरिकेचा संबंध आणखी मजबूत करणार!

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

दक्षिण आशियामध्ये दहशतवाद वाढत असल्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत असून, याबाबतही एकमेकांना सहकार्य करण्याचे या वेळी ठरविण्यात आले. दोवाल यांनी अमेरिकेच्या संरक्षण विषयक समितीच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. 

वॉशिंग्टन : संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करण्याचा आणि दहशतवादासह विविध प्रादेशिक मुद्द्यांवर सहकार्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय भारत आणि अमेरिका यांच्यात आज झालेल्या चर्चेदरम्यान घेण्यात आला.

भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज अमेरिकचे परराष्ट्र मंत्री जेम्स मॅटिस, अंतर्गत सुरक्षामंत्री जॉन केली आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅकमास्टर यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

स्वतंत्रपणे झालेल्या या तिन्ही चर्चांमध्ये भारत आणि अमेरिकेमधील सहकार्य आणि भागीदारीमध्ये वाढ करण्याचा मुद्दा समान होता. दक्षिण आशियामध्ये दहशतवाद वाढत असल्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत असून, याबाबतही एकमेकांना सहकार्य करण्याचे या वेळी ठरविण्यात आले. दोवाल यांनी अमेरिकेच्या संरक्षण विषयक समितीच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. 

दक्षिण आशियामध्ये स्थैर्य कायम ठेवण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची मॅटिस यांनी चर्चेदरम्यान प्रशंसा केली. दहशतवादाशी हरप्रकारे लढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मॅटिस यांनी मान्य केले. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आल्यापासून दोवाल यांचा हा दुसरा अमेरिका दौरा होता.

Web Title: India-US to cooperate in Defense sector more aggressively