...भारतास गंभीर परिणाम भोगावे लागतील: चीन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - वेगवेगळी नावे धारण करुन भारतातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करणाऱ्या तीन चिनी पत्रकारांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी करण्यात आल्यासंदर्भात संताप व्यक्त करत चीनने "भारतामधील सरकार संशयी असून; भारतास या कृतीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,‘ असा इशारा दिला आहे. याचबरोबर, भारताच्या या कृतीस चीननेही "जशास तसे‘ उत्तर द्यावे, अशी मागणी ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून करण्यात आली आहे.

आण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) प्रवेश मिळविण्यास अपयश आल्यामुळेच भारताकडून "सूड‘ घेतला जात असल्याची टीका या लेखाच्या माध्यमामधून करण्यात आली आहे. आता भारतीयांना व्हिसा देण्यासंदर्भातही अशाच स्वरुपाचे धोरण अंमलात आणले जावे, असे या लेखामधून ध्वनित करण्यात आले आहे. ""भारताचे अशा स्वरुपाचे धोरण हे येथील राष्ट्रवादाच्या वाढत्या प्रमाणाचे फलित आहे. भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही असल्याच्या पाश्‍चिमात्य देशांमधील जनमतामुळे भारतीयांमध्ये अभिमानाची बलिष्ठ भावना विकसित झाली आहे,‘‘ असे या लेखामध्ये म्हटले आहे.

दिल्लीमधील शिन्हुआचे शाखाप्रमुख (ब्युरो चीफ) वु किआंग आणि मुंबईमधील त्यांचे लु तांग आणि शे योंगगांग यांना सरकारने 31 जुलैपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला आहे. हे तीन पत्रकार वेगवेगळी फसवी नावे घेऊन देशातील प्रवेशावर निर्बंध असलेल्या विविध संवेदनशील ठिकाणांस भेट देत असल्याचे गुप्तचर खात्याने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या तीनही पत्रकारांचा व्हिसा रद्द करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून वु यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे; तर इतर दोन पत्रकारांनाही व्हिसा मुदतवाढ देण्यात आली होती.

चीनमधून पत्रकारांची हकालपट्टी होणे, ही फारशी आश्‍चर्यकारक बाब नाही. सहा महिन्यांपूर्वीच चीनमधून एका फ्रेंच महिला पत्रकाराची हकालपट्टी करण्यात आली होती. शिनजियांग प्रांतामधील मुस्लिमांसंदर्भातील चीनकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणांवर या पत्रकाराने टीका केली होती. यासंदर्भात माफी मागण्यास नकार दिल्यामुळे या महिला पत्रकाराची हकालपट्टी करण्यात आली होती. या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून परदेशी माध्यमांची गळचेपी करण्यात येत असल्याची टीका मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.

Web Title: ... India will have to face serious consequences: China