बायडेन यांचे सल्लागार विवेक मूर्ती कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याविषयी

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 31 October 2020

मुळचे कर्नाटकचे असणारे भारतीय-अमेरिकी नागरिक विवेक मूर्ती बायडेन यांच्या निवडणूक कॅम्पेनमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत.

वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका 3 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी दोन्ही नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. ज्यो बायडेन यांनी सध्याच्या राष्ट्राध्यक्षांना हरवण्यासाठी कंबर कसली आहे. बायडेन यांच्या या प्रयत्नांमध्ये त्यांना भारतीय वंशाच्या व्यक्तींची मदत मिळत आहे. त्यांच्या महत्वाच्या रणनितीकारांमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांचा समावेश आहे. 

मुळचे कर्नाटकचे असणारे भारतीय-अमेरिकी नागरिक विवेक मूर्ती बायडेन यांच्या निवडणूक कॅम्पेनमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. जर बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करण्यात यशस्वी झाले, तर डेमोक्रॅट सरकारमध्ये मूर्ती यांना महत्वाची जागा मिळू शकते. मूर्ती हे सर्जन जनरल आहेत. मूर्ती यांच्यासोबत दुसरे एक भारतीय-अमेरिकी अर्थतज्ज्ञ असलेले राज चेट्टी बायडेन यांच्या कॅम्पेनमध्ये मदत करत आहेत. विशेष म्हणजे कोरोना महामारीदरम्यान बायडेन यांनी मूर्ती आणि चेट्टी यांच्याकडून सल्ला घेतला आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात बायडेन आणि मूर्ती यांचे दररोज बोलणं होत होते, असं सांगितले जाते. 

पैगंबरांची निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद योग्यच; AMU च्या विद्यार्थी नेत्याचे...

कोण आहेत विवेक मूर्ती?

बराक ओबामा यांच्या प्रशानसामध्ये मूर्ती यांनी सेवा बजावली आहे. मूर्ती यांचे मूळ कर्नाटकमधील मांड्या जिल्ह्यातील हालेगेरे गावातील आहे. ते मागासवर्गीयांचे नेते असलेल्या एचटी नारायन शेट्टी यांचे नातू आहेत. मूर्ती यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून बीए केलंय, तर येले स्कुल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी घेतली आहे. येले स्कुल ऑफ मेडिसिनमधून त्यांनी एमडी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी कर्नाटकमधील आपल्या गावातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी काही निधीही दिला आहे. 

बराक ओबामा यांच्या कार्यकाळात मूर्ती यांची सर्जन जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते अध्यक्षांचे सार्वजनिक आरोग्यातील सुधारणेबाबतचे सल्लागार होते. माझे वडील शेतकरी होते आणि मीही तेच बनावं अशी त्यांची इच्छा होती. पण, माझ्या आजोबांच्या आग्रहाखातर मला शिक्षण देण्यात आले. माझ्या कुटुंबातील कोणीही गाव सोडलेले नव्हते, असं ते म्हणाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian American Vivek Murthy key advisor to Joe Biden has roots in Karnataka