सार्वभौम पॅलेस्टाइनची भारताला आशा

पीटीआय
बुधवार, 17 मे 2017

द्विपक्षीय पातळीवर भारत हा पॅलेस्टाइनच्या विकासातील उपयुक्त सहकारी असेल. या देशातील विकासाला आमचा कायमच पाठिंबा असेल. आज झालेले करार हे आमच्या या धोरणाचे स्पष्ट उदाहरण आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली - पॅलेस्टाइनच्या प्रश्‍नाबाबत भारताचा त्यांना भक्कम पाठिंबा असेल, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महंमद अब्बास यांना दिले. इस्राईलबरोबर शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात सार्वभौम, एकसंध आणि स्वतंत्र पॅलेस्टाइन पाहण्याची भारताला आशा असल्याचेही मोदी या वेळी म्हणाले.

अब्बास हे काल (ता. 15) भारताच्या दौऱ्यावर आले. त्यांनी आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. मोदी हे जुलै महिन्यात इस्राईलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी पॅलेस्टाइन आणि इस्राईल या दोघांमधील चर्चा पुन्हा सुरू होऊन सर्वसमावेशक उपाय शोधण्याचा प्रयत्न व्हावा, अशी मोदी यांची इच्छा आहे. या दृष्टिकोनातून मोदी आणि अब्बास यांच्यात आज चर्चा झाली. यासह इतरही विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान पाच करारांवर सह्या करण्यात आल्या. यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी सर्वांबरोबर संवाद साधला.

ते म्हणाले, ""इस्राईलबरोबर शांततापूर्ण व्यवहार असलेल्या सार्वभौम, स्वतंत्र आणि एकसंध पॅलेस्टाइन अस्तित्वात आलेला पाहण्याची आम्हाला आशा आहे. याबाबतीत आमचा पॅलेस्टाइनला संपूर्ण पाठिंबा आहे. पॅलेस्टाइन आणि इस्राईल यांनी लवकरात लवकर शांततापूर्ण चर्चेला सुरवात करून आपापसांतील समस्येवर सर्वसमावेशक उत्तर शोधावे.'' भारताने दिलेल्या या पाठिंब्याबद्दल अब्बास यांनी आभार मानले. ""भारत हा आमचा मित्र आहे. त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा वाढत आहे. आमची समस्या सोडविण्यात ते महत्त्वाची भूमिका निभावू शकतात,'' असे अब्बास यांनी सांगितले. पॅलेस्टाइनच्या मित्र देशांच्या यादीत भारताचे स्थान वरचे असल्याची भावनाही अब्बास यांनी व्यक्त केली.

आशिया आणि आखाती प्रदेशांतील विविध समस्यांवर मोदी आणि अब्बास यांच्यात चर्चा झाली. या भागांमधील शांतता टिकविण्याचे सर्व जगासमोर आव्हान असल्याचे मोदी यांनी सांगितले. अब्बास यांनीही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला. भारत आणि पॅलेस्टाइनदरम्यान कृषी, आयटी आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स, आरोग्य, क्रीडा सहकार्य या क्षेत्रांबरोबरच राजनैतिक पासपोर्ट असणाऱ्यांना व्हिसामध्ये सवलत देणे, असे पाच करार झाले.

द्विपक्षीय पातळीवर भारत हा पॅलेस्टाइनच्या विकासातील उपयुक्त सहकारी असेल. या देशातील विकासाला आमचा कायमच पाठिंबा असेल. आज झालेले करार हे आमच्या या धोरणाचे स्पष्ट उदाहरण आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: Indian backs Palestine