मॉरीशसच्या तेल गळती प्रकरणात भारतीय कॅप्टनला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 19 August 2020

मॉरीशसच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जपानच्या मालिकेचे असणाऱ्या जहाजाच्या भारतीय कॅप्टनला अटक केली आहे.

पोर्ट लुईस- मॉरीशसच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जपानच्या मालिकेचे असणाऱ्या जहाजाच्या भारतीय कॅप्टनला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, तेल वाहून घेऊन जाणारे जहाज समुद्र किनाऱ्यावर दोन भागामध्ये तुटले होते. त्यामुळे हजारो टन तेल समुद्रात सांडल्याने पाणी प्रदुषित झाले आहे. एमवी वाकाशिओ जहाज 25 जूलै रोजी येथे पोहोचले होते. त्यानंतर जहाजातून तेलाचा विसर्ग सुरु झाला. त्यामुळे हजारो टन तेल पर्यटकांचे आकर्षन केंद्र असणाऱ्या मॉरीशयच्या समुद्र किनाऱ्यावरील निळ्या पाण्यामध्ये मिसळले आहे. 

‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती...

हजारो टन तेल किनाऱ्यावर सांडल्याने मॉरिशसला मोठा फटका बसला आहे. देशाची अर्थव्यवस्था ही मुख्य करुन पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र, किनाऱ्यावरील पाणी दूषित झाल्याने मॉरिशसला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सिंगापूरवरून ब्राझीलला निघालेले हे जहाज मॉरीशस येथे कसे पोहोचले, याबाबतचा खुलासा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला नाही. 

जहाजाचे कॅप्टन आणि सेकंट इन कमांड या दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात आणण्यात आले होते. अन्य क्रू सदस्यांचीही चौकशी केली जात आहे, अशी माहिती अधिकारी शिवा कूथेन यांनी दिली आहे. जहाजाचे कॅप्टन भारतीय वंशाचे नागरिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ( जे श्रीलंकेचे रहिवासी आहेत) पायरेसी आणि समुद्री कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत अटक करण्यात आली आहे. त्यांना 25 ऑगस्टला पुन्हा न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, जहाजात जवळजवळ 4000 टन इंधन होते, यातील 1000 टन तेलाची गळती झाली आहे. उर्वरित 3000 टन केल जहाजातून काढण्यात आले आहे. आम्ही एका नाजून ऑपरेशनमध्ये गुंतलो आहोत, असं मेरिटाईम ऑपरेशनचे प्रमुख एलेन डोनाल्ड यांनी सांगितलं. तेलाच्या सफाई करण्याच्या अभियानासाठी जपानने आपल्या सहा लोकांची टीम मॉरिशसला पाठवली आहे. शिवाय सोमवारी अन्य सात तज्ज्ञांची टीम पाठवणार असल्याची घोषणा जपानने केली आहे. 

बिहारचे DGP म्हणाले, आम्ही बरोबर होतो हे सिद्ध झाले!

इतके महत्त्व का? 

ही तेल गळती पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागात झाली आहे. मॉरिशसमधील ब्लू बे या सागरी संरक्षित ठिकाणापासून जवळच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे तेल गळती आधीच्या घटनांपेक्षा कमी असली तरी परिणाम तितकाच भयानक असू शकतो. या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ आणि केवळ याच ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पती उगवतात. येथे १७०० प्रकारचे सागरी जीव असून यामध्ये ८०० प्रकारचे मासे, १७ प्रकारचे सस्तन जीव आणि दोन प्रकारच्या कासवांचा समावेश आहे. याशिवाय प्रवाळ बेटे, खारफुटीचे जंगल आहे. या सर्वांना आता धोका निर्माण झाला आहे. २०१० मध्ये मेक्सिकोच्या आखातात ४ लाख टन तेलाची गळती झाल्यानंतर हजारो सागरी जीवांचा मृत्यू झाला होता.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian captain arrested in Mauritius oil spill case