भारतीय वंशाच्या प्रिती पटेल ब्रिटनच्या गृहमंत्रिपदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

ब्रिटनमधील हुजूर पक्षाच्या नेतृत्वासाठी चालवण्यात आलेल्या 'बॅक बोरिस' अभियानातील प्रीती पटेल या प्रमुख सदस्य होत्या. त्यामुळे नव्या कॅबिनेटमध्ये त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 

लंडन : ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या खासदार प्रिती पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री बनणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या नागरिक ठरल्या आहेत.

ब्रिटनमधील हुजूर पक्षाच्या नेतृत्वासाठी चालवण्यात आलेल्या 'बॅक बोरिस' अभियानातील प्रीती पटेल या प्रमुख सदस्य होत्या. त्यामुळे नव्या कॅबिनेटमध्ये त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 

मूळच्या गुजराती असलेल्या प्रीती पटेल भारतीय वंशाच्या लोकांच्या सर्व मुख्य कार्यक्रमांमध्ये अतिथी म्हणून उपस्थित असतात. तसेच ब्रिटनमध्ये त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशंसक म्हणून ओळखले जाते. 

नव्या कार्यभाराविषयी घोषणा होण्यापूर्वी प्रीती पटेल म्हणाल्या होत्या की, 'नव्या मंत्रिमंडळात आधुनिक ब्रिटन आणि आधुनिक हुजूर पक्षाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे.'

प्रीती पटेल यांचे आई-वडील गुजराती होते. आफ्रिका खंडातील युगांडा येथे वास्तव्यास असलेले त्यांचे आई-वडील 60 च्या दशकात इंग्लंडमध्ये गेले होते. 47 वर्षीय प्रीती पटेल सर्वप्रथम 2010 मध्ये विटहॅम मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2015 आणि 2017 मध्येही त्यांनी या मतदारसंघामधून विजय मिळवला होता. याआधी प्रीती पटेल यांनी डेव्हिड कॅमेरून यांच्या सरकारमध्ये रोजगार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian origin Priti Patel appointed as home minister of Britain