मोठी बातमी : भारतीयांचा यूके, अमेरिका, कॅनडा आणि युएईला प्रवास शक्य

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 14 August 2020

नुकतेच भारत आणि मालदीव या दोन्ही राष्ट्रांतील हवाई प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशाने  एअर बबल करारास मान्यता मिळाली होती.  त्यानंतर आता आणखी चार राष्ट्रांमध्ये प्रवास करणे सुलभ होणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय हवाई क्षेत्राचे नियमन करणाऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी हवाई वाहतूकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रकारचे वैध व्हिसा असलेले भारतीय 'एयर बबल्स' कराराअंतर्गत (Air Bubble  Agreement) यूके, अमेरिका, कॅनडा आणि युएई प्रवास आता शक्य होणार आहे.  यापूर्वी केवळ आवश्यक व्हिसा असणाऱ्यांनाच परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आवश्यक व्हिसा धारकांशिवाय अन्य प्रकारच्या व्हिसा धारकांना परदेशात जाण्यास निर्बंध होते.

ब्राझीलमधून आलेल्या चिकनमध्ये कोरोना; चीनच्या दाव्यामुळे खळबळ

नुकतेच भारत आणि मालदीव या दोन्ही राष्ट्रांतील हवाई प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशाने  एअर बबल करारास मान्यता मिळाली होती.  त्यानंतर आता आणखी चार राष्ट्रांमध्ये प्रवास करणे सुलभ होणार आहे. तत्पूर्वी भारताने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी येथे एअर बबल्सच्या कराराअंतर्गत वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. जगभरात कोविड -19 च्या वेगाने होणाऱ्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीला मोठा फटका बसला आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने भारतातही आपले जाळे विणले आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध घालण्यात आले होते. सुरक्षित उपाय योजनेसह आता हवाई वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरु असून भारताकडून याबाबत योग्य ती पावले उचलली जात आहेत.  

हे वाचा - रशियाची कोरोना लशीची घाई ठरू शकते धोकादायक

एअर बबल म्हणजे काय? 
एअर बबल ही एक द्विपक्षीय करार व्यवस्था आहे. यामध्ये दोन्ही देशांच्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांचे नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असते. विशेष नियमावली अंतर्गत या कराराच्या माध्यमातून दोन्ही देशातील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नियमित हवाई वाहतूक सुरु होत नाही तोपर्यंत या कराराअंतर्गतच विमान सेवा होणे अपेक्षित आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indians now fly to US UK Canada and UAE Under Air Bubble Agreement