ब्राझीलमधून आलेल्या चिकनमध्ये कोरोना; चीनच्या दाव्यामुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

चीनमधील शेनझेनमध्ये स्थानिक आजार नियंत्रण केंद्राने (सीडीसी) ब्राझीलमधून पाठविलेल्या चिकनचे नियमित तपासणीसाठी नमुने घेतले होते.

बीजिंग - जगभरात कोरोनाची साथ वेगाने पसरत असताना चीनने (China) ब्राझीलमधून (Brazil) पाठवलेल्या फ्रोजन चिकनमध्ये कोरोना विषाणू (Covid19) आढळल्याचा दावा केला आहे. गेल्या आठवड्यातही चीनमधील यांताई शहरात इक्वाडोरमधून पाठवलेल्या झिंगा माशामध्ये कोरोना विषाणू आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. 

चीनमधील शेनझेनमध्ये स्थानिक आजार नियंत्रण केंद्राने (सीडीसी) ब्राझीलमधून पाठविलेल्या चिकनचे नियमित तपासणीसाठी नमुने घेतले होते. हे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. त्यानंतर, इतर वस्तूंसह चिकनच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. अद्याप ब्राझीलने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. 

वाचा - भारत, रशिया आणि अमेरिकेसह जगभरात काय चाललंय; एका क्लिकवर वाचा 7 बातम्या

सावधानता बाळगा 
दरम्यान या घटनेनंतर शेनझेनमधील सीडीसीने परदेशातील खाद्यपदार्थांबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्येही शिनफैडी सीफूड मार्केटमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणाची उदाहरणे आढळली होती. त्यानंतर, संबंधित सर्वजणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मुळात वुहानमधील वटवाघूळ, सापाचे मांस विकणाऱ्या मार्केटमधूनच कोरोना सर्वप्रथम आढळल्याचा संशय आहे. त्यानंतर जगभरात कोरोनाचा प्रसार झाला. यावरून वाद वाढू लागल्यानंतर चीनने वुहानमधील फूड बाजार बंद केला होता. 

हे वाचा - रशियाची कोरोना लशीची घाई ठरू शकते धोकादायक

बरा झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना 
कोरानामधून पूर्णपणे बरे झालेल्या दोन रुग्णांची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने चीनची चिंता वाढली आहे. हुबेईमध्ये डिसेंबरमध्ये एका ६८ वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर, तिची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आली. शांघायमध्येही एप्रिलमध्ये कोरोनाग्रस्त असलेल्या एका व्यक्तीची चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आली. मात्र, तिच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chicken imported from brazil tasted corona positive claim china