esakal | सर्वांच्या कल्याणावर भारताचा विश्‍वास
sakal

बोलून बातमी शोधा

india flag

सर्वांच्या कल्याणावर भारताचा विश्‍वास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : मानवतेच्या भल्यासाठी काम करण्यावर भारताचा विश्‍वास असून आम्ही कायमच मैत्री आणि सहकार्यासाठी तयार आहोत, असे प्रतिपादन परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी आज केले. लेखी या सध्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी आज येथील भारतीय समुदायाला संबोधित केले.

हेही वाचा: पाककडून ‘हिंसाचाराच्या संस्कृती’ला खतपाणी; आमसभेत भारताची टीका

भारतीय वकीलातीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मीनाक्षी लेखी यांनी अमेरिकेतील भारतीयांचे कौतुक केले. ‘‘येथील भारतीयांनी त्यांनी स्वीकारलेल्या देशाच्या भल्यासाठी मोठे योगदान दिले आहे. भारतीय जेथे राहतात, त्या समुदायामध्ये मिसळून जातात. मानवजातीच्या कल्याणासाठी काम करण्यावर आपला विश्‍वास असतो.

भारत कायमच शांततेचा आणि सर्वांच्या विकासाचा समर्थक देश राहिला आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम’ हेच आपले धोरण असून भारताचा हा संदेश विविध देशांमधील भारतीयांच्या माध्यमातून जगभरात पोहचविला जातो,’ असे लेखी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

स्वत:चा विकास घडवून आणत असतानाच भारत इतरांनाही मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मीनाक्षी लेखी यांनी सांगितले. जगासमोर अनेक नवी संकटे निर्माण होत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर शस्त्रनिर्मितीसाठी करण्याऐवजी शांततामय विकासासाठी करण्यावर भारताचा भर असल्याचेही त्या म्हणाल्या.

सुधारणेला काही देशांचा विरोध

सध्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या रचनेमध्ये जगाचे बदलेले वास्तव प्रतिबिंबीत होत नाही, या रचनेत सुधारणा करण्याची नितांत आवश्‍यकता असून काही निवडक देश त्यात अडथळा आणत आहेत, अशी टीका मीनाक्षी लेखी यांनी केली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्रांची स्थापना होऊन ७५ वर्षे झाली आहेत. मात्र, या संस्थेच्या रचनेत, विशेषत: सुरक्षा समितीमध्ये काहीही बदल झालेला नाही. यामुळे या संस्थेचाच जीव गुदमरत आहे, असे लेखी म्हणाल्या.

loading image
go to top