झाकिर नाईकनं पुन्हा कालवलं विष; पाकिस्तानातील मंदिरतोडीचं केलं समर्थन, म्हणाला...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

मलेशियामध्ये पलायन केलेल्या इस्लामिक उपदेशक झाकिर नाईक यांनी पुन्हा एकदा धार्मिक विद्वेषाचं विष कालवलं आहे.

क्वालांलाम्पूर : मलेशियामध्ये पलायन केलेल्या इस्लामिक उपदेशक झाकिर नाईक यांनी पुन्हा एकदा धार्मिक विद्वेषाचं विष कालवलं आहे. झाकिर नाईक यांनी पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिर तोडल्याच्या घटनेचं समर्थन केलं आहे. तसेच त्यांनी म्हटलंय की, एका इस्लामिक देशामध्ये हिंदू मंदिराच्या उभारणीला मंजूरी दिली जाऊ शकत नाही. नाईक यांनी म्हटलंय की जर एखाद्या इस्लामिक देशात मुर्ती असेल तर तिला तोडून टाकलं पाहिजे. 

मिळालेल्या माहितीनुसार झाकिर नाईक यांनी आपल्या ताज्या व्हिडीओत म्हटलंय की, जेंव्हा मोहम्मद साहेब काबाला परतले होते. तेंव्हा त्यांनी काबामधील जवळपास सर्व 360 मूर्ती नेस्तनाबूत केल्या होत्या. एका इस्लामिक देशात एखादी मूर्ती अथवा प्रतिमा असणे गैर आहे. आणि जर ती असेल तर तिला तोडून टाकणेच आवश्यक आहे. 
पाकिस्तानमध्ये अलिकडेच काही दिवसांपूर्वी एका हिंदू मंदिराला तोडण्याची घटना घडली होती. त्यानंतर मंदिराला आगदेखील लावण्यात आली होती. यादरम्यानच पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रातांचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी शुक्रवारी म्हटलं की ज्या मंदिराची तोडफोड झुंडीद्वारे करण्यात आली, त्याचे पुनर्निर्माण करण्यात येईल. 

हेही वाचा - पाकिस्तानला आली अक्कल; पाडलेले हिंदू मंदिर पुन्हा उभारणार

NIA च्या भीतीमुळे झाकिर नाईकचे मलेशियात पलायन
नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी झाकिर नाईकची चौकशी करत आहे. झाकिर नाईक या तपासाला घाबरुन पळून जाऊन मुस्लिम बहुल देश असणाऱ्या मलेशियामध्ये राहत आहे. नाईकवर मनी लाँड्रींग तसेच द्वेषमूलक भाषण दिल्याचा आरोप आहे. त्याचे नाव 2016 मधील ढाकामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्येही आलं होतं. या स्फोटामुळे शेकडो लोक मारले गेले होते. या बॉम्बस्फोटास कारणीभूत आरोपीने कबूल केलं होतं की झाकिर नाईकच्या भाषणामुळेच तो हे नृशंस कृत्य करण्यासाठी प्रेरित झाला. 

NIA च्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, गेल्या जवळपास 4 वर्षांपासून झाकिर नाईक मलेशियात राहतो. भारतात त्याचे भाषण पीस टिव्हीवर प्रसारित व्हायचे ज्यावर आता बंदी आहे. ब्रिटन आणि कॅनडाने त्याला व्हिसा द्यायला नकार दिला होता. त्यानंतर मलेशियाने त्याला आसरा दिला. झाकिर नाईकवर लोकांमध्ये विद्वेष पसरवणे तसेच जबरदस्ती धर्मपरिवर्तन करण्याचे आरोप आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: islamic preacher zakir naik supports demolition of hindu temple in pakistan