पाकिस्तानला आली अक्कल; पाडलेले हिंदू मंदिर पुन्हा उभारणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 2 January 2021

खैबर पख्तुनवा प्रांतातील करक जिल्ह्यातील टेरी भागात जमावाने पाडलेल्या हिंदू मंदिराची उभारणी सरकारकडून केली जाईल

पेशावर- खैबर पख्तुनवा प्रांतातील करक जिल्ह्यातील टेरी भागात जमावाने पाडलेल्या हिंदू मंदिराची उभारणी सरकारकडून केली जाईल, असे खैबर पख्तुनवा प्रांताचे मुख्यमंत्री मेहमूद खान यांनी जाहीर केल्याचे द डॉन वृत्तपत्राने म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत ४० जणांना अटक केली आहे.

Breaking: स्वदेशी भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' लशीच्या वापराला मंजुरी

चार दिवसांपूर्वी टेरी येथील हिंदू मंदिरावर शेकडो लोकांनी हल्ला केला आणि त्याला आग लावली होती. शासनाच्या परवानगीनंतरच या मंदिराचे विस्तारीकरणाचे काम सुरू होते. परंतु स्थानिकांनी विरोध करत मंदिराची तोडफोड केली. तरुण, वयस्कर आणि लहान मुलांचा समावेश असलेल्या जमावाने हिंदू संत श्री परमहंसजी महाराज समाधीची विटंबना केली. या घटनेचा मानवी हक्क कार्यकर्ते आणि अल्पसंख्यांक संघटनांनी निषेध केला. सुरवातीला पोलिसांनी कोणताही कारवाई केली नाही. मात्र सर्वत्र निषेधाचे पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. खैबर पख्तुनवा सरकारने याप्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही, असे सांगितले. 

मानवी हक्काविषयी नियुक्त केलेल्या एकसदस्यीय समितीचे अध्यक्ष डॉ. शोहेब सुडेल यांनी मंदिराच्या विटंबनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि घटनेची माहिती घेतली. मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी निषेध केला असून दोषी व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. मंदिर परिसरात शांतता असून मंदिराची पुनर्रचना केली जाईल, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी चाळीसहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता कार्यालयात जाण्यास उशीर झाला तर सुटी...

सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वयेच मंदिराचा जीर्णोद्धार

करक जिल्ह्यातील तेरी गावातील ऐतिहासिक मंदिर आणि परमहंसजी महाराज यांच्या समाधीचे 2015 च्या सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार जीर्णोद्धार आणि विस्तार केला जात होता. या मंदिराला याआधी 1997 मध्ये एका स्थानिक मुफ्तीने नष्ट केलं होतं तसेच त्यावर अवैधरित्या ताबा मिळवला होता.

अनेक लोकांनी या घटनेला लज्जास्पद ठरवलं. हा नवा पाकिस्तान आहे, असं म्हणत या घटनेची निंदा केली गेलीय. तसेच देशातील धार्मिक अल्पसंख्यांकांसोबत कशाप्रकारे व्यवहार केला जात आहे, याबाबत सवाल केले जात आहेत. पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याच्या बातम्या सातत्याने येत राहतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khyber pakhtunkhwa hindu temple will be rebuild pakistan crowd demolishes