अमिरातीला ‘एफ ३५’ विकण्यास विरोधच; इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
Thursday, 20 August 2020

गेल्याच आठवड्यात इस्राईल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक करार झाला होता. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांचा हा खुलासा महत्त्वाचा मानला जात आहे.

जेरुसलेम - इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त अरब अमिरातीला अत्याधुनिक ‘एफ ३५’ या अमेरिकी लढाऊ विमानांच्या विक्रीला विरोध दर्शविला आहे. गेल्याच आठवड्यात इस्राईल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक करार झाला होता. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांचा हा खुलासा महत्त्वाचा मानला जात आहे.

इस्राईलच्या ‘द येडिओट अहरोनोट’ वृत्तपत्राने अमेरिकेने अरब देशांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकण्याचा करार केल्याचे वृत्त दिले होते. त्यावर नेतान्याहू यांनी निवेदन जारी केले आहे. अमेरिकी आणि अमिरातीच्या सूत्रांच्या हवाले इस्राईलच्या संमतीमुळे या करारावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला होता. त्याचप्रमाणे, नेतान्याहू यांनी इस्रायली संरक्षण आस्थापनांना तसेच संरक्षणमंत्री बेन्नी गॅंट्‌स आणि परराष्ट्रमंत्री गॅबी ॲशकेनाझी यांना अंधारात ठेवून हा करार केल्याचेही वृत्त होते.      

लडाख संघर्षप्रकरणी जीनपिंग यांच्यावर महिलेची टीका; चीनने उचलले कठोर पाऊल

नेतान्याहू यांनी मध्यपूर्वेतील कोणत्याही देशांना एफ ३५ विमानांसह शस्त्रास्त्रे विक्री करण्याला विरोध दर्शविला. यात इस्राईलबरोबर शांतता करार केलेल्या देशांचाही समावेश आहे, असे स्पष्टीकरण दिले.  पंतप्रधानांनी अमेरिकेच्या प्रशासनासमोर आपली ही भूमिका वारंवार मांडली असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. संयुक्त अरब अमिरातीबरोबरच्या शांतता कराराचा शस्त्रास्त्रे विक्रीशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेनेही आपण इस्राईलच्या हितसंबंधांना धक्का न पोचण्याची पूर्ण काळजी घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मोस्साद प्रमुख अबू धाबीत
इस्राईलच्या ‘मोस्साद’ या गुप्तहेर संघटनेनेही अमिरातीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अबू धाबीत भेट घेतल्याचे वृत्त अमिरातीच्या ‘डब्लूएएम’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले होते. हे दोन्ही देश वेगाने राजनैतिक संबंध प्रस्थापित करत असून रविवारी (ता.१६) त्यांच्यातील दूरध्वनी सेवाही सुरू झाली. तरीही, प्रादेशिक लष्करी वर्चस्व कायम ठेवणे, हा इस्राईलच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. इस्राईलचे अमेरिकेबरोबर नजीकचे संबंध असून आपल्या शेजारी देशाला अत्याधुनिक शस्त्रे न विकण्याची विनंती इस्राईलने केली होती.

अमिरातीला ‘एफ ३५’ विमानात रस का?
संयुक्त अरब अमिरातीला दीर्घ काळापासून अमेरिकेच्या ‘एफ ३५’ या लढाऊ विमानात रस आहे. रडारला चुकविणारे हे विमान इस्राईलच्या ड्रोनवरही हल्ला करू शकते. त्यामुळेच अमिरातीला ती हवी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Israeli Prime Minister Benjamin Netanyahu