लडाख संघर्षप्रकरणी जीनपिंग यांच्यावर महिलेची टीका; चीनने उचलले कठोर पाऊल

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 19 August 2020

काई यांनी जून महिन्यात ब्रिटनमधील गार्डीयन वृत्तपत्राला मुलाखत दिली होती.

बीजिंग- चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कट्टर टीकाकार असलेल्या प्राध्यापिका काई शीया यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली. सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाने हा निर्णय घेतला. सेंट्रल पार्टी स्कूल या संस्थेच्या संकेतस्थळावरील सूचनेचा हवाला देत हाँगकाँगमधील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हे वृत्त दिले. देशातील आर्थिक आणि सामाजिक समस्यांपासून तसेच पक्षातील प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जिनपिंग यांनी सीमेवरील संघर्षासाठी भारताला डिवचले असा आरोप काई यांनी केला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलेची मागितली माफी; मतांसाठी नवी चाल
 

काई यांनी जून महिन्यात ब्रिटनमधील गार्डीयन वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, जिनपिंग यांनी आपले स्थान आणि अधिकार बळकट करण्यासाठी भारताला डिवचण्याशिवाय अमेरिकाविरोधी भावनेला खतपाणी घातले. चीनला साऱ्या जगाचा शत्रू बनविण्यात काय फायदा आहे, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले होते. जिनपिंग यांनी अध्यक्षांच्या दोन कार्यकाळांची मर्यादा हटवण्यासाठी घटना बदल केला. यामागे त्यांचा आजन्म पदावर राहण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोरोना मृतांची आकडेवारी दडपणे, जानेवारीत साथीची तीव्रता लक्षात आल्यानंतरही निर्मूलनासाठी पुरेसे प्रयत्न न करणे असे आरोपही काई यांनी केले. लोक सत्य बोलू शकत नसल्यामुळे चीनची वाटचाल संकटाकडे सुरु असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या संस्थेत काम

काई 68 वर्षांच्या असून त्या सेंट्रल पार्टी स्कुलमध्ये शिकवायच्या. राजकीय विचारसरणीला चालना देणारी एक महत्त्वाची संस्था म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. 2012 मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी जिनपिंग हे याच शाळेचे प्रमुख होते.

चीनची कोविड-19 लस डिसेंबरपर्यंत येणार बाजारात; भारताला मिळणार का?

काई यांच्याविरुद्धचे आक्षेप

1) भाषणांमुळे गंभीर राजकीय समस्या ओढविल्या
2) भाषणांचे स्वरूप अत्यंत तिरस्करणी/
3) भाषणांमुळे देशाचा लौकिकाला तडा
4) पक्षाच्या राजकीय शिस्तीच्या भंगाचा गंभीर प्रकार

सध्या अमेरिकेत

आपण अमेरिकेत असून सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असल्याचे काई यांनी या वृत्तपत्राला सांगितले. आणखी भाष्य करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman criticizes Jinping over Ladakh conflict China