'जैश'चा म्होरक्‍या मसूद अजहर जिवंत; पाक माध्यमांचा दावा 

Masood Azhar
Masood Azhar

इस्लामाबाद : जैशे महंमद दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मौलाना मसूद अजहर जिवंत असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.

पाकिस्तानी माध्यमांनीच असा दावा केला असून, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी याबाबत माहिती दिल्याचे म्हटले आहे. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मसूद अजहरच्या मृत्यूचे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे. 
 
दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानातील काही माध्यमांनी केला होता; तर भारताच्या हवाई हल्ल्यात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे काही माध्यमांचे म्हणणे आहे. पाकिस्तान सरकारने मात्र मसूद अजहरवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे म्हटले होते.  मसूदच्या मृत्यूची बातमी ट्‌विटरवरून पहिल्यांदा पसरली होती. भारताने बालाकोटला केलेल्या हवाई हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, असे ट्‌विट काही यूजरनी केले; तर भारताने निर्माण केलेल्या दबावापासून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीची पाकिस्ताननेच खोटे वृत्त पसरविल्याचा दावा काही जणांनी केला आहे. 

मसूद अजहर हा जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या आहे. भारतात घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी त्याने पाकव्याप्त काश्‍मीर आणि पाकिस्तानात दहशतवादी अड्डे उभारले आहेत. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आल्यानंतर प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी मसूदला भारत सरकारने एक डिसेंबर 1999 रोजी मुक्त केले होते. 

'जैश'वर कारवाई शक्‍य 
भारताकडून आणि जागतिक पातळीवरूनही दबाव वाढत असल्याने पाकिस्तान सरकार जैशे महंमदसह बंदी असलेल्या सर्व दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करू शकते. तसेच, "जैश'चा प्रमुख मसूद अजहरचे नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास असलेला विरोधही ते मागे घेऊ शकतात, असे पाकिस्तानमधील माध्यमांचे म्हणणे आहे. मसूदचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याबाबत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने बुधवारी (ता. 27) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव सादर केला आहे. मसूदचे नाव या यादीत आल्यास त्याच्या प्रवासावर बंदी येऊन त्याची सर्व मालमत्ता जप्त होणार आहे. गेल्या दहा वर्षांतील मसूदविरोधातील हा चौथा प्रस्ताव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com