किम जोंग यांना कोणत्याही अटींशिवाय भेटण्याची तयारी; जपानच्या नवनियुक्त पंतप्रधांनाची इच्छा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्यानंतर योशिहिदे सुगा यांनी देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. नेहमीच सहकार्याची भूमिका असलेल्या सुगा यांनी आता उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगची भेट कोणत्याही अटींशिवाय घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

टोक्यो - जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्यानंतर योशिहिदे सुगा यांनी देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. नेहमीच सहकार्याची भूमिका असलेल्या सुगा यांनी आता उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगची भेट कोणत्याही अटींशिवाय घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुगा यांनी काही दिवसांपूर्वीच जपाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानंतर सुगा यांनी शिंजो आबे यांची अर्धवट राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. 

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत केलेल्या भाषणात सुगा म्हणाले की, कोरोनाच्या लढ्यात जपानसुद्धा जगासोबत आहे. याशिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेच्या आय़ोजनासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वेगानं वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं. ते पुढच्या वर्षी जुलै महिन्यात करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या या संकटात स्पर्धेचं आयोजन सुरक्षेची काळजी घेऊन करण्याचा प्रयत्न करू असं सुगा यांनी सांगितलं. 

शिंजो आबे यांना कित्येक वर्षांपासून उत्तर कोरियासोबत सुरु असलेला वाद सोडवता आलेला नाही. जपानी नागरिकांच्या अपहरणाचा मुद्दा आणि उत्तर कोरियाचा अणु आणि मिसाइल प्रोग्रॅम यांच्या मुद्द्यांचा समावेश यामध्ये आहे. सुगा म्हणाले की, जपान आणि उत्तर कोरिया यांच्यासोबत चांगले संबंध स्थापित करण्याने फक्त दोन देशांमधील इतर प्रश्न सुटतील असं नाही तर प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी जी पावलं उचलावी लागतील त्यासाठी मला वेळ दवडायचा नाही असंही सुगा म्हणाले. 

हे वाचा - UN महासभेत भारताने पाकला दाखवली जागा; इमरान खान यांच्या भाषणावेळी केलं वॉकआऊट

सध्या जगभरात अनेक देशांमध्ये सीमावाद, व्यापारावरून तणावाचे वातावरण आहे. परराष्ट्र नितीवरून सुगा यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. मात्र सुगा यांनी अपहरणाच्या प्रकरणांवर अनेक वर्षे काम केलं आहे. जपानी नागरिकांच्या अपहरणाचा मुद्दा त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: japan prime minister suga say ready to meet kim jong without any condition