esakal | जेफ बेजोस 5 जुलैला सोडणार अ‍ॅमेझॉनचं सीईओ पद; हीच तारीख का?
sakal

बोलून बातमी शोधा

Jeff Bezos

जेफ बेजोस 5 जुलैला सोडणार अ‍ॅमेझॉनचं सीईओ पद; हीच तारीख का?

sakal_logo
By
सूरज यादव

अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी पदाचा राजीनामा देण्याची तारीख जाहीर केली आहे. जेफ बेजोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी 5 जुलै 2021 रोजी सीईओ पद सोडणार असल्याचं सांगितलं आहे. जेफ बेजोस यांच्यानंतर अॅमेझॉनची जबाबदारी अँडि जेसी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. पद सोडण्यासाठी जेफ बेजोस यांनी निवडलेली तारीख ही खास आहे. 27 वर्षांपूर्वी जेफ बेजोस यांनी याच दिवशी कंपनीची स्थापना केली होती. तेव्हा इंटरनेटवरून काही पुस्तके विकण्यास सुरु केलेली ही कंपनी आज जगातील सर्वात मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे.

बेजोस यांनी राजीनामा देण्याची घोषणा आधीच केली होती. मात्र 5 जुलै रोजी पद सोडणार असल्याचं बुधवारी सांगितलं. त्यांनी म्हटलं की, बरोबर 27 वर्षांपूर्वी 5 जुलै 1994 रोजी कंपनीची सुरुवात केली होती आणि 5 जुलै 2021 रोजी माझं पद सोडत आहे. कंपनीच्या सीईओ पदावरून बाजुला होत असल्याचं सांगताना बेजोस भावुक झाले. बेजोस म्हणाले की, आता कंपनीच्या इतर क्षेत्राकडे लक्ष देण्याची योजना आहे. बेजोस अर्थ फंड, ब्लू ओरिजिन स्पेस शिप कंपनी, अॅमेझॉन वन फंड आणि द वॉशिंग्टन पोस्ट यात लक्ष घालणार असल्याची माहिती बेजोस यांनी दिली.

हेही वाचा: भारतीय युजर्सवर परिणाम नाही; प्रायव्हसीबाबत केंद्राचा खुलासा

फेब्रुवारीमध्ये जेफ बेजोस यांनी घोषणा केली होती की, अँडि जेसी अॅमेझॉनचे नवीन सीईओ असतील. जेसी यांनी 1997 मध्ये अॅमेझॉनसोबत काम सुर केलं. हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केलेल्या जेसी यांनी अॅमेझॉन वेब सर्विसेसची सुरुवात केली होती. त्यानंतर क्लाउड प्लॅटफॉर्ममध्ये आणलं. जेसी सीईओ झाल्यावर त्यांची जागा कोण घेणार हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही.