esakal | अंतराळ भरारीचे कोंदण; बेझोस यांची 11 मिनिटांची वैशिष्ट्यपूर्ण अवकाश सफर
sakal

बोलून बातमी शोधा

Jeff Bezos

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या प्रवासी यानाचा अवकाशातील ११ मिनिटांचा प्रवास अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. त्याविषयी.

अंतराळ भरारीचे कोंदण; बेझोस यांची 11 मिनिटांची वैशिष्ट्यपूर्ण अवकाश सफर

sakal_logo
By
मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

जेफ आणि मार्क बेझोस या बंधूसमवेत आणखी दोघांनी अंतराळ सफर केली. वॉली फंक ही ८२ वर्षांची स्त्री अंतराळवीर आणि नेदरलँडचा १८ वर्षीय ऑलिव्हर डेमेन. म्हणजे सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अंतराळवीर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. वॉली फंक `नासा’च्या पहिल्या १३ स्त्री अंतराळ प्रवास प्रशिक्षणार्थीपैकी एक. मर्क्युरी-१३ या नावानेही या स्त्री अंतराळवीरांची ओळख आहे. त्यांनी विविध चाचण्यांतून स्वतःला सिद्ध केले. काही वेळा पुरुष अंतराळ प्रशिक्षणार्थींनाही मागे टाकले. मात्र ‘नासा’ने कधीही या स्त्री वैमानिकांना अंतराळ प्रवासाची संधी दिली नाही. याबाबत ‘नासा’कडे बोट दाखवलं तरी, हे प्रशिक्षण ‘नासा’चं होतं, हा गैरसमज असल्याचं म्हणतात. ज्या चाचण्या ‘नासा’ने अंतराळवीरांसाठी स्वीकारल्या होत्या, त्याचा जनक लवलेस. लवलेसनी पुरुषांइतकीच अंतराळात प्रवास करण्याची स्त्रीची क्षमता आहे का, हे पाहण्यासाठी हे प्रशिक्षण दिले. शारिरिक, मानसिक, बौद्धिक साऱ्या पातळ्यांवर स्त्रिया पुरुषांइतक्याच अंतराळ प्रवासाला सक्षम आहेत, हे अगणित चाचण्यांद्वारे त्यांनी सिद्धही केलं. मात्र ‘नासा’ने पुढील काही चाचण्यांसाठीची मदत लवलेसनी विनंती करूनही नाकारली. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.

उड्डाणाचा दांडगा अनुभव

या प्रशिक्षणात सहभागी स्त्रियाचे अंतराळ प्रवासाचे स्वप्न धुळीला मिळाल्यावर त्यांनी आपल्या प्रवासाचा मार्गच बदलला. प्रत्येकीने वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकलं. वॉली फंकनी जग फिरून येण्याचे ठरवले. काही वर्षांनी त्या वैमानिक झाल्या, विमान चालवण्याचे प्रशिक्षण देऊ लागल्या. अखेर अपघातग्रस्त विमानांच्या तपासणी व सुरक्षिततेतील अडचणींचा अभ्यास करून त्यावर सरकारला उपाय सुचवण्याचं काम स्वीकारले. त्यांनी आतापर्यंत १९,६०० तास उड्डाण केलंय आणि ३,००० वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहे. तथापि, तब्बल ६० वर्षानंतर वॉली फंक यांचं अंतरिक्षात झेपावण्याचं स्वप्न साकार झाले, ते न्यू शेफर्ड यानामुळे आणि जेफ बेजोसनी प्रवासासाठी आमंत्रित केल्यामुळे!

हेही वाचा: Toofan Review; 'तुफान' एक छोटीशी वावटळ!

५२ वर्षापुर्वीच्या घटनेला उजाळा

ऑलिव्हर डेमेन या नेदरलँडच्या १८ वर्षांच्या मुलाला अनपेक्षितपणे ही संधी मिळाली. ब्लू ओरिजिन कंपनीने तिकिटाचा लिलाव बारा जूनला जगभरात सुरू केला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १५९ देशांतून ७,६०० लोकांची अंतराळात जाण्यासाठी वाट्टेल तितके पैसे मोजण्याची तयारी होती. बोलीचा आकडा वाढत गेला आणि २८ दक्षलक्ष डॉलर्सला तिकीट विकलं गेलं. ऑलिव्हर यानंतरच्या यानातून अंतराळात जाणार होता.

पण आयत्यावेळेला ज्या माणसाने तिकिट जिंकलं त्याने वेळ जुळत नसल्याने माघार घेतली आणि ऑलिव्हरची वर्णी या पहिल्यावहिल्या प्रवासी यानात लागली. तो अंतराळात जाणारा सर्वात तरूण ठरला. उरलेल्या दोन प्रवाशात स्वतः जेफ बेझोस आणि त्यांचा भाऊ मार्क बेझोस होते.

अपोलो-११ हे यान चंद्रावर गेल्याला जुलै महिन्यात ५२ वर्षे झाली. हाच मुहूर्त साधून बेझोसचा व्यावसायिक यानाने यशस्वी अंतराळ प्रवास पार पडला. या अंतराळ प्रवासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ॲमेझॉनचा राजीनामा देणाऱ्या जेफ बेझोससाठी उड्डाणाची यशस्वितता उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्याचे चिन्ह आहे. लवकरच पुन्हा हे यान झेपावेल.

jeff bezos

jeff bezos

हेही वाचा: चीनमधील हेनान प्रांतात अतिवृष्टी! पुरात 25 जणांचा मृत्यू

करही तेवढाच भरावा!

या मोहिमेबद्दल अर्थातच टिकेचं वादळही उठले. २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार बर्नी सॅन्डर्सनी आपली नाराजी आधीच तीव्र शब्दांत व्यक्त केली आहे. पृथ्वीवरच्या सर्वात श्रीमंत गणल्या जाणाऱ्या अमेरिकेसारख्या देशात लोकांना रोजच्या उदरनिर्वाहाची भ्रांत आहे, वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत पण त्याचं कुणाला काय? जगातली श्रीमंत व्यक्ती अंतरिक्षात झेपावली आहे. अब्जाधीशांनी करही तेवढाच भरावा.’ अशा अर्थाचे त्यांनी ट्विट केलं आहे. बेझोसना मात्र भविष्यकाळाकडे नागरिक आणि प्रजातीचा दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता वाटते. आज आपण जे करतो तो पुढच्या पिढीसाठी अंतरिक्षात काम करण्याचा पाया असेल. त्यामुळे पृथ्वीवरच्या समस्या काही प्रमाणात सुटतील, असं त्यांना वाटते.

संशोधनासाठी निधी

यशस्वी अंतराळ सफरीनंतर नवे क्षेत्र जेफना खुणावत असलं, तरी तीव्र स्पर्धेलाही तोंड द्यावे लागण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत. स्पेसएक्सचे इलॉन मस्क, व्हर्जिन गलॅक्टिकचे रिचर्ड ब्रॅनसन यांनी आधीच एक पाऊल पुढे टाकलंय. गेल्याच आठवड्यात रिचर्ड ब्रॅनसननी अवकाशात झेप घेतली. तेही टिकेला तोंड देतंच. त्याचे ध्येय मंगळावर मनुष्यवस्तीला हलवण्याचे असल्याचे सांगतात. मनुष्य हा एकाच ग्रहावरचा प्राणी असता कामा नये, असं त्यांना वाटते. ब्लू ओरिजिनाने तिकिटविक्रीतून आलेल्या २८ दशलक्ष डॉलर्सपैकी १९ दशक्षलक्ष डॉलर्स अंतराळ संबंधित सेवाभावी संस्थांना देण्याचे जाहीर केले आहे. यातील एक संस्था आहे ॲस्त्राफिमेना (AstraFemina). इथे संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील स्त्रिया एकत्रितपणे काम करून मुलींपुढे आदर्श उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा: चाकांविना ६०० किमी वेगाने धावली ‘तरंगती’ रेल्वे

ब्लू शेफर्ड अंतरिक्षात झेपावून ११ मिनिटात परतही आले. त्यातून प्रवास केलेल्या चौघांना अविस्मरणीय अनुभवाची सफर घडली. सर्वसामान्यांना थेट प्रक्षेपणाचा आनंद मिळाला. कितीही टिका झाली तरी, गर्भश्रीमंतांना अंतराळाचा रस्ता खुला झालाय, हे नाकारण्यात अर्थ नाही.

loading image