बायडन बंपर धमाका; 5 लाख भारतीयांना नागरिकत्व, मुस्लिमांवरील निर्बंध हटवण्याच्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सत्तेची शपथ घेतल्यानंतर लगेचच कामकाजाचा धडाका लावला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सत्तेची शपथ घेतल्यानंतर लगेचच कामकाजाचा धडाका लावला आहे. बायडेन यांनी एकामागून एक अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करुन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांना फिरवून टाकलं आहे. या दरम्यानच बायडन यांनी परदेशी प्रवाशांना दिलासा देणाऱ्या एका कार्यकारी आदेशावर देखील स्वाक्षरी केली आहे. या आदेशान्वये 1.1 कोटी अशा प्रवाशांना फायदा होणार आहे ज्यांच्याकडे कसलेही कायदेशीर दस्ताऐवज नाहीयेत. यामध्ये जवळपास 5 लाख लोक भारतीय आहेत.

जो बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वांत आधी इमिग्रेशन सिस्टमला पूर्णपणे बदलण्यास सुरवात केली आहे. त्यांनी आपल्या आदेशांद्वारे अशा अनेक दस्ताऐवजांवर हस्ताक्षर केले जे ट्रम्प यांच्या वादग्रस्त इमिग्रेशन सिस्टमला बदलणारे आहेत. जो बायडन यांनी अमेरिकन काँग्रेसला विनंती केली आहे की, त्यांनी 1.1 कोटी अवैध प्रवाशांना स्थायी स्वरुपाचा दर्जा आणि त्यांना नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा बनवावा. एका अंदाजानुसार, यामध्ये जवळपास 5 लाख लोक भारतीय वंशाचे आहेत ज्यांच्या जवळ कायदेशीर दस्ताऐवज नाहीयेत. जो बायडन प्रशासनाचे हे इमिग्रेशन सिस्टम विधेयक ट्रम्प प्रशासनाच्या कडक धोरणांच्या विरोधात आहे.

हेही वाचा - छप्पर फाड के! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मिळतो एवढा पगार; तरीही काहींनी नाकारलं वेतन

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बायडन यांनी बुधवारी शपथग्रहण केल्यानंतर हे विधेयक सादर केलं जाऊ शकतं. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक उमेदवार म्हणून बायडन यांनी ट्रम्प यांच्या या धोरणांना अमेरिकन मूल्यांवरील हल्ला म्हणून संबोधलं होतं. या 1.1 कोटी लोकांना अमेरिकेच्या बाहेर काढलं जाण्याचा धोका होता. बायडन यांनी सत्तेत आल्याबरोबर म्हटलं की ते या नुकसानाची भरपाई करतील. 

मुस्लिम बहुल देशांच्या प्रवासावरील निर्बंध हटवले
बायडन यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात निर्णय घेत मुस्लिमांवरील निर्बंध हटवले आहेत. 2017 मध्ये ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांवर निर्बंध आणले होते. बायडन यांनी या देशांतील लोकांसाठी व्हिसा प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश दिला आहे. सोबतच ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं म्हटलं आहे. बायडन यांनी मेक्सिकोच्या सीमेवर बनणाऱ्या भींतीचं बांधकाम देखील रोखण्याचा आदेश दिला आहे. बायडन यांच्या या धडाकेबाज निर्णयांमुळे त्यांचं समर्थन करमाऱ्यांनी त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joe Biden plans to modernise US immigration system