छप्पर फाड के! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मिळतो एवढा पगार; तरीही काहींनी नाकारलं वेतन

US president
US president

वॉशिंग्टन : अमेरिकेत 20 जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते देशाचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा देशातीलच नव्हे तर जगातील एक शक्तीशाली व्यक्ती मानला जातो. मात्र, फेडरल कायद्यांअंतर्गत या पदाच्या काही मर्यादा आणि सीमा देखील आखून ठेवल्या गेल्या आहेत. एवढ्या महत्त्वाच्या व्यक्तीला काय काय सोयी-सुविधा मिळत असतील बरे? तसेच त्या व्यक्तीला किती पगार मिळत असावा? असे प्रश्न पडणे साहजिक आहे. तसा तो तुम्हालाही पडला असेल. 

एवढा असतो राष्ट्राध्यक्षाला पगार
अमेरिकन कायद्यानुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे वार्षिक वेतन चार लाख अमेरिकन डॉलर इतकं ठरवलं गेलं आहे. भारतीय रुपयांमध्ये बोलायचं झालं तर ही रक्कम जवळपास दोन कोटी 92 लाख रुपये इतकी होते. याशिवाय राष्ट्राध्यक्षाला वार्षिक 50 हजार डॉलर रुपये विविध भत्त्यांसाठी मिळतात. तर एक लाख डॉलरचे नॉन टॅक्सेबल ट्रॅव्हल अलाऊंस देखील दिला जातो. सोबतच त्यांना 19 हजार डॉलर मनोरंजनासाठी म्हणून खर्च दिला जातो. विशेष म्हणजे, फर्स्ट लेडी म्हणजेच राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला कसल्याही प्रकारचे वेतन प्राप्त होत नाही. 

आतापर्यंत पाच वेळेला वाढले वेतन
अमेरिकेच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत फक्त पाच वेळेलाच राष्ट्राध्यक्षांचे वेतन वाढवलं गेलं आहे. 1789 मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यावेळे राष्ट्राध्यक्षांचे वेतन 25 हजार डॉलर होते. या वेतनामध्ये अलिकडची वाढ 2001 मध्ये झालीय. त्यावेळी अमेरिकीन काँग्रेसने राष्ट्राध्यक्षांचे वेतन दुप्पट केलं होतं.


            साल           वेतन

  • 1789    25 हजार डॉलर
  • 1873    50 हजार डॉलर
  • 1909    75 हजार डॉलर
  • 1949    एक लाख डॉलर
  • 1969    2 लाख डॉलर
  • 2001    4 लाख डॉलर

या सुविधांचा मिळतो लाभ
चार लाख डॉलरच्या वेतनाशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना लिमोजिन, मरीन वन आणि एअर फोर्स वनची देखील सूट मिळते. या तिन्हीमध्ये राष्ट्राध्यक्षांचा प्रवास मोफत होतो. याशिवाय व्हाईट हाऊसमध्ये राहण्यासाठी कसल्याही प्रकारचे भाडे राष्ट्राध्यक्षाला द्यावे लागत नाही. तर या पदावरुन निवृत्त झाल्यानंतर राष्ट्राध्यांना वार्षिक दोन लाख डॉलरचे  पेन्शन मिळते, तसेच राहण्यासाठी घर, कार्यालय आणि हेल्थ केअर कव्हरेज देखील मिळतं.

या राष्ट्राध्यक्षांनी घेतलं नाही वेतन
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांचे वेतन सर्वाधिक असते. मात्र अनेक असे राष्ट्राध्यक्ष देखील आहेत, ज्यांनी कधीच वेतन घेतले नाहीये. अमेरिकेचे 31 वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी वेतन घेतलं नव्हतं. तसेच ते दान केलं होतं. ते आपले वेतन नाकारणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. यानंतर 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनेडी यांनी देखील वेतन घेण्यास नकार दिला होता. कॅनेडी यांनी आपले वेतन धर्मार्थ संस्थांना दान केलं होतं. यांच्या शिवाय तीन बिलीयन डॉलरची संपत्ती असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आपले सगळे वेतन दान करण्याचे वचन दिले होते. त्यांनी 2017 मध्ये आपल्या वेतनातील एक तृतीयांश भाग दान केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com