जो बायडन यांचा पाय फ्रॅक्चर, श्वानासोबत खेळताना झाले जखमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना चालण्यास त्रास होऊ शकतो. 

वॉशिंग्टन- अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आपल्या श्वानासोबत खेळताना जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या पायाच्या हाड फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ते चालू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. बायडन हे त्यांचा जर्मन शेफर्ड श्वान 'मेजर' बरोबर खेळत होते. त्यांच्याकडे असे दोन श्वान आहेत. बायडन हे जखमी झाल्याचे समजल्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन बायडन हे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

जो बायडन यांचे खासगी डॉक्टर केविन ओ कॉर्नर यांनी सांगितले की, बायडन यांच्या पायाला दुखापत झाली आहे. एक्स रे मध्ये ही दुखापत दिसून आली नाही. परंतु, सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना चालण्यास त्रास होऊ शकतो. 

हेही वाचा- शत्रूंना त्यांच्याच देशात जाऊन संपवणारी इस्त्राईलची 'मोसाद'; इराणी अणु शास्त्रज्ञाच्या हत्येने पुन्हा चर्चेत

78 वर्षीय बायडन हे आपल्या श्वानाबरोबर खेळताना पडले. नेवार्क येथे तज्ज्ञांनी रविवारी त्यांच्यावर एक तासापर्यंत उपचार केले. दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर बायडन हे येत्या 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील नावेही निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हेही आपला पराभव मान्य करत आहेत. 

हेही वाचा- चीन, रशियाच्या कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joe Biden Suffers Fractures To Foot After Injury While Playing With His Dog