हफीझ सईदचा पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश?: नव्या पक्षाची स्थापना

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

अल्लाने सईद यांची सुटका केल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेऊ. यानंतर त्यांची निश्‍चित भूमिका ठरेल. ते पाकिस्तानचे नेते आहेत...

इस्लामाबाद - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची सूत्रे हलविलेल्या पाकिस्तानातील लष्करे-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेली जमात उद दवा आता एका राजकीय पक्षाची स्थापना करणार आहे.

जमातचा म्होरक्‍या हफीझ मुहम्मद सईद याला राष्ट्रसंघाकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले असून अमेरिकेकडून त्याच्यावर 1 कोटी डॉलर्सचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील लाहोर येथे सईद याला गेल्या जानेवारी महिन्यापासून दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. गेल्या 1 ऑगस्ट रोजी सईद याच्या नजरकैदेमध्ये आणखी दोन महिन्यांनी वाढ करण्यात आली होती.

राष्ट्रसंघाकडून औपचारिकरित्या सईद हा दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर, प्रवासावर व शस्त्रखरेदीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नव्या राजकीय पक्षाची घोषणा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. "मिली मुस्लिम लीग' या पक्षाची औपचारिकरित्या घोषणा करताना सैफुल्ला खालिद यांनी या पक्षाच्या कामकाजामधील सईद याची भूमिका अद्याप निश्‍चित झालेली नसल्याचे म्हटले आहे.

"अल्लाने सईद यांची सुटका केल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेऊ. यानंतर त्यांची निश्‍चित भूमिका ठरेल. ते पाकिस्तानचे नेते आहेत,'' असे या पक्षामधील एका प्रभावी नेत्याने म्हटले आहे. पाकिस्तानमधील सध्याच्या अस्थिर राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर सईद याच्या राजकीय प्रवेशाची ही शक्‍यता अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

याआधी, सईद याचेच नवीन "ब्रेन चाईल्ड' असलेल्या "तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली होती. जमात उद दवावर अद्याप पाकिस्तानमधील सरकारकडून केवळ "लक्ष' ठेवण्यात येत आहे. 

Web Title: JuD seeking to enter political space, launches new party in Pakistan