esakal | काबूल: निधीसाठी तालिबानची मदार चीनवर
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

काबूल: निधीसाठी तालिबानची मदार चीनवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल: अफगाणिस्तानमध्ये बंदुकीच्या बळावर सत्ता बळकावलेल्या तालिबानसमोर अत्यंत बिकट असे आर्थिक आव्हान आहे. निधीसाठी आपली मदार चीनवर असेल आणि चीन हाच सर्वांत महत्त्वाचा भागीदार असेल असे तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे.

हेही वाचा: जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचा Re-Election न लढण्याचा निर्णय

पाश्चात्त्य देशांचा पाठिंबा असलेल्या सरकारने शरणागती पत्करल्यानंतर २० वर्षांचे युद्ध संपले असले तरी आर्थिक संकट आणि सार्वत्रिक उपासमार या देशावर ओढवण्याची भीती आहे. परदेशी सैन्य अफगाणिस्तानमधून परतले आहे. तालिबानने देशाची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर अनेक देशांनी अफगाणिस्तानचा निधी रोखला आहे. अफगाणिस्तानला मानवतावादी मदत मिळावी म्हणून संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) १.३ अब्ज डॉलर निधीसाठी आवाहन केले आहे.

ही रक्कम केवळ ३९ टक्के निधी उभारता आली आहे असे यूएनचे प्रवक्ते स्टीफन दुजारीच यांनी सांगितले आहे. अफगाणिस्तानला तातडीने निधीची निकड आहे, पण सुमारे दहा अब्ज डॉलरच्या घरातील मालमत्ता मिळविण्याची संधी वेगाने उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण अफगाण सेंट्रल बँकेची बहुतांश मालमत्ता परदेशात आहे.

हेही वाचा: पंजशीरमध्ये लढाई, वयोवृद्धांचा 'माइन क्लियरन्स टुल' म्हणून वापर

या पार्श्वभूमीवर इटलीच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती मुजाहिद म्हणाला की, चीनच्या मदतीने आर्थिक आघाडीवरील पीछेहाट भरून काढण्यासाठी संघर्ष करू. चीनमुळे आम्हाला त्यासाठी मूलभूत आणि अप्रतिम अशी संधी मिळाली आहे, याचे कारण गुंतवणूक करून आमच्या देशाची पुनर्बांधणी करण्यास चीन तयार आहे.

महिला मंत्री नाहीच

मुजाहीदने इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. महिलांविषयी तालिबानचे धोरण कळीचा मुद्दा ठरला आहे. भविष्यात महिलांना विद्यापीठांत शिक्षण घेऊ दिले जाईल. परिचारिका, पोलिस किंवा मंत्रालयात सहाय्यक म्हणून त्यांना काम करणे शक्य होईल. महिलांची मंत्रिपदी नियुक्ती मात्र केली जाणार नाही.

नवा ‘सिल्क मार्ग’ महत्त्वाचा

चीनने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी नवा सिल्क मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. तालिबानने यास फार महत्त्व दिले आहे, असे मुजाहीदने सांगितले. या प्रकल्पाच्या माध्यमातून व्यापारी मार्ग उघडून जागतिक प्रभाव वाढविण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

चीनच्या रूपाने बाजारपेठेचा पास

अफगाणिस्तानमध्ये बहुमोल खनिजांच्या अनेक खाणी आहेत. यात तांब्याच्याही खाणींचा समावेश आहे. चीनच्या मदतीने त्या पुन्हा कार्यान्वित करण्याची तसेच आधुनिकीकरण करण्याची तालिबानला आशा आहे. जगभरातील बाजारपेठेसाठी चीनच्या रूपाने पास मिळेल, असे उद्गारही मुजाहीदने काढले.

loading image
go to top