US Election : भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदी; अमेरिकेत घडला इतिहास!

टीम ई-सकाळ
Sunday, 8 November 2020

हॅरिस यांच्याकडे २०२४ च्या आगामी निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रबळ उमेदवार म्हणूनही पाहिले जात आहे. बिडेन सध्या ७७ वर्षांचे आहेत. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीवेळी ते आपली उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता कमीच आहे.

US Election 2020 : वॉशिंग्टन (अमेरिका) : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. राष्ट्राध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या ज्यो बायडेन आणि त्यांच्या सहकारी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या झोळीत अमेरिकी नागरिकांनी मते टाकली. आणि याच निकालाबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. 

हाती आलेल्या निकालाप्रमाणे, ज्यो बायडेन यांना २७३ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. तर ट्रम्प यांना २१४च मते मिळाली आहेत. २७० हा जादुई आकडा ओलांडत बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेच्या इतिहासात गेल्या दोन शतकांपासून श्वेतवर्णीयांचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र, हॅरिस यांच्या रुपानं अमेरिकेचा इतिहास नव्याने लिहला जाणार आहे. डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार असलेल्या कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदासाठी पूर्वीपासूनच पसंती मिळाली होती. ५१ टक्के अमेरिकी नागरिकांनी हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष व्हाव्या, अशी इच्छा व्यक्त केली होती.

 'We Did It Joe', बायडेन यांना कमला हॅरिस यांचा कॉल; शेअर केला VIDEO​

हॅरिस यांनी रचला इतिहास
हॅरिस यांना दोन तृतीयांश आफ्रिकन-अमेरिकन आणि लॅटिन मतदारांचे समर्थन मिळाले. तसेच त्यांना श्वेतवर्णीय आणि आशियाई मतदारांचीही पसंती मिळाली. याचबरोबर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणारी पहिली कृष्णवर्णीय महिला बनण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. मतदानाच्या दिवशी मिशिगनमधील डेट्रॉईटमधील ग्रेटर ग्रेस टेंपल पोलिंग स्टेशनवर हॅरिस पोहोचल्या होत्या. या भागात कृष्णवर्णीय मतदारांची संख्या मोठ्या संख्येत आहे. त्यावेळी त्यांनी तेथे मतदानासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत उभे राहत मतदान केल्याबद्दल आभार मानले होते. 

अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही महिलेला उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकता आलेली नव्हती. याआधी दोन महिलांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवलेली आहे. १८८४मध्ये गिराल्डिन फेरारो यांनी डेमोक्रॅटिककडून, तर २००८मध्ये सारा पॅलिन यांनी रिपब्लिकनकडून निवडणूक लढविली होती. पण या दोघींना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकत इतिहास घडवला. 

US Election 2020 : ज्यो बायडेन बनले अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष; ट्रम्प यांच्यावर केली मात

हॅरिस यांच्याविषयी...
२० ऑक्टोबर १९६४ रोजी कमला हॅरिस यांच्या जन्म झाला. ५६ वर्षीय हॅरिस या कॅलिफोर्नियाच्या सिनेट सदस्य, उपराष्ट्राध्यक्षपदावर निवड झालेल्या दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या व्यक्ती म्हणून हॅरिस बहुसांस्कृतिकतेचे प्रतिनिधित्व करतात. चार वर्षांपूर्वी हिलरी क्लिंटन यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, हॅरिस यांच्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात महिलांपुढे नव्याने आशेचा किरण निर्माण झाला आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या पहिल्या महिला जिल्हा मुखत्यार आणि कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

हॅरिस यांच्याकडे २०२४ च्या आगामी निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रबळ उमेदवार म्हणूनही पाहिले जात आहे. बिडेन सध्या ७७ वर्षांचे आहेत. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीवेळी ते आपली उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता कमीच आहे. पण, २०२० मध्ये पार पडलेल्या निवडणुकीसाठी बिडेन यांनी हॅरिस यांना सोबतीला घेत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आणि ती जिंकलीही. पुढील वर्षी २० जानेवारीला ज्यो बिडेन अध्यक्ष तर हॅरिस या उपाध्यक्षपदाची शपथ घेतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamala Harris becomes first black woman South Asian elected US Vice President