पाकिस्तानमध्ये गाढवांच्या किंमतीनंतर दुधही महागले

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

कराची डेअरी फार्मर्स असोसिएशनने इंधन दरवाढीमुळे दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ केली आहे.

कराचीः पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत.

पाकिस्तानमध्ये नुकतीच इंधनाच्या दरामध्ये 6.45 रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे डिझेलचे दर 117.43 रुपये प्रति लिटर तर पेट्रोलचा दर 98.89 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या नऊ महिन्यांमधील ही सर्वांत मोठी वाढ आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य नागरिकांना वाहने परवडत नाहीत. महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्य नागरिकांना इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे वाहतूकीसाठी गाढवांचा वापर केला जातो. यामुळे गाढवांना मोठी मागणी आहे.

कराची डेअरी फार्मर्स असोसिएशनने इंधन दरवाढीमुळे दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ केली आहे. सरकारकडे आम्ही अनेकदा दरवाढ करण्यासंदर्भात मागणी केली होती. मात्र, वेळोवेळी सरकारने आम्हाला दरवाढ करण्यापासून रोखले. अखेर आम्ही स्वत:च दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे असोसिएशनने सांगितले आहे. दुसरीकडे प्रशासनाने दूध विक्री करणाऱ्या असोसिएशनने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. वाढीव दराने दूध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दरही भरमसाठ वाढले आहेत. पाकिस्तानमध्ये महागाईचा दर 9.41 टक्क्यांवर पोहचला आहे. पाकिस्तानी जनता आधीच फळे, भाज्या, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे त्रासलेली असतानाच त्यांना आता दुध दरवाढीचा फटका बसला आहे. प्रचंड महागाईने नागरिकांमध्ये असंतोष पसरताना दिसत आहेत. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला शेतमालाचा पुरवठा बंद केला होता. त्यावेळी पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे दर 200 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले होते. भारताने पाकिस्तानला टोमॅटोचा पुरवठा बंद केल्याने ही भाववाढ झाली होती.

Web Title: The Karachi Dairy Farmers Association hike milk price now it cost 180 rs per litre