शरीफ यांचे पुन्हा रडगाणे: काश्‍मीरच मूळ समस्या

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

काश्‍मीरमध्ये भारतीय फौजांकडून निष्पाप काश्‍मिरी नागरिकांच्या केल्या जाणाऱ्या हत्येचा पाकिस्तान तीव्र निषेध नोंदवित आहे

इस्लामाबाद - भारत व पाकिस्तानमधील संघर्षाचे केंद्रस्थान काश्‍मीरच असल्याचे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर, काश्‍मीरप्रश्‍नी सर्वमान्य तोडगा निघाल्याशिवाय या भागामध्ये समृद्धी व शांतता नांदणे अशक्‍य असल्याचा गर्भित इशाराही शरीफ यांनी यावेळी दिला.

"संयुक्‍त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीमधील सर्वांत जुनी समस्या असलेली काश्‍मीरची समस्या ही भारताच्या फाळणीची प्रक्रिया अद्यापी पूर्ण झाली नसल्याचे निदर्शक आहे. सुरक्षा समितीच्या अनेक ठरावांच्या माध्यमांमधून आंतरराष्ट्रीय समुदायाने वचन दिलेल्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यापासून काश्‍मिरी जनतेस भारताने गेल्या सात दशकांपासून रोखले आहे. आज काश्‍मिरी एकता दिनाच्या निमित्त स्वयंनिर्णयाच्या तत्त्वासहित मुलभूत मानवाधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या काश्‍मीरमधील आमच्या बंधु व भगिनींना पाकिस्तानचा असलेला नैतिक, राजकीय व राजनैतिक पाठिंबा पुन्हा एकदा ठामपणे व्यक्‍त करण्याची आवश्‍यकता आहे. काश्‍मीरमध्ये भारतीय फौजांकडून निष्पाप काश्‍मिरी नागरिकांच्या केल्या जाणाऱ्या हत्येचा पाकिस्तान तीव्र निषेध नोंदवित आहे. परंतु, भारताच्या वर्चस्वापासून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करणाऱ्या काश्‍मिरी नागरिकांस भारताकडून करण्यात येत असलेले अत्याचार विचलित करु शकलेले नाहीत,'' असे शरीफ म्हणाले.

Web Title: Kashmir core dispute between India-Pakistan,says Sharif