"वॉनाक्राय रॅन्समवेअर'ला रोखण्यासाठी "किल स्वीच'

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

ब्रिटनमधील या संशोधकाने याबाबत माहिती कळताच मालवेअरचे विश्‍लेषण करण्यास सुरवात केली. या विश्‍लेषणाबाबत ट्‌विटरवर माहिती अपडेट करत असतानाच अमेरिकेतीलही काही संशोधक याबाबत विश्‍लेषण करत होते. त्या सर्वांनी चर्चा करताना ब्रिटनमधील "मालवेअरटेक'ला याबाबतचा "किल स्वीच' म्हणजेच रोखण्याचा मार्ग अचानक सापडला

लंडन - जगातील जवळपास शंभर देशांमध्ये झालेला सायबर हल्ला रोखण्याचा मार्ग शोधण्यात आला असून, ब्रिटनमधील बावीस वर्षांच्या संशोधकाने अमेरिकेतील काही संशोधकांच्या मदतीने हे काम केले आहे. या संशोधकाचे खरे नाव माहीत नसून "मालवेअरटेक' या नावानेच त्याच्याकडून "ट्‌विटर'वर माहितीचे आदानप्रदान केले जाते.

शुक्रवारपासून (ता. 12) "वॉनाक्राय रॅन्समवेअर' हा मालवेअर जगभरातील संगणक यंत्रणांमध्ये पसरत आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोजचे जुने व्हर्जन असलेल्या यंत्रणांमध्ये हा मालवेअर ई-मेलच्या माध्यमातून पसरतो. यामुळे अनेक यंत्रणांमधील डेटा लॉक होऊन कामकाज ठप्प झाले आहे. डेटा अनलॉक करण्यासाठी तीनशे डॉलरची खंडणीही डिजिटल करन्सीच्या स्वरूपात मागण्यात आली आहे. याचा फटका रुग्णालये, बॅंका, कंपन्या यांना मोठ्या प्रमाणात बसला असून, मालवेअर पसरलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे; मात्र ब्रिटनमधील या संशोधकाने याबाबत माहिती कळताच मालवेअरचे विश्‍लेषण करण्यास सुरवात केली. या विश्‍लेषणाबाबत ट्‌विटरवर माहिती अपडेट करत असतानाच अमेरिकेतीलही काही संशोधक याबाबत विश्‍लेषण करत होते. त्या सर्वांनी चर्चा करताना ब्रिटनमधील "मालवेअरटेक'ला याबाबतचा "किल स्वीच' म्हणजेच रोखण्याचा मार्ग अचानक सापडला.

मालवेअरकडून वापरात असलेले डोमेन रजिस्टर केल्यास त्याचा प्रसार रोखता येतो, हे त्याच्या लक्षात आले. रजिस्टर नसलेल्याच डोमेनला मालवेअरकडून लक्ष्य केले जात असल्याने डोमेन रजिस्टर करणे हा रोखण्याचा मार्ग म्हणजेच किल स्वीच असल्याचे "मालवेअरटेक'ने ट्‌विटरवर म्हटले आहे. या किल स्वीचमुळे मालवेअर रोखण्याचा मार्ग मिळाला असला, तरी आधीच ज्या यंत्रणांमध्ये मालवेअर आला आहे, त्यावर उपाय मिळालेला नाही.

यंत्रणा अपडेट करण्याचा सल्ला
किल स्वीच मिळाला असला तरी आपली यंत्रणा लवकरात लवकर अपडेट करण्याचा सल्लाही "मालवेअरटेक'ने दिला आहे. हॅकर्सकडून कोड बदलला जाऊन ते पुन्हा हल्ला करू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. मालवेअरटेक हा सायबर सुरक्षेचाच एक भाग आहे. या समुदायातील लोक एखाद्या कंपनीसाठी अथवा स्वतंत्रपणे काम करतात, ते सायबर हल्ल्यांवर लक्ष ठेवतात आणि हल्ला झाल्यास त्यावर तोडगा काढण्याचा एकत्रितपणे प्रयत्न करतात. यासाठी ते ट्‌विटर अथवा इतर सोशल नेटवर्किंग साइटवरून माहितीचे आदानप्रदान करतात.

Web Title: kill switch to stop wanna cry malware