चार्ली हेब्दोच्या जून्या कार्यालयाजवळ चाकू हल्ला; 4 जण गंभीर जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 25 September 2020

बहुचर्चित नियतकालिक चार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाजवळ आज चाकू हल्ला झाला.

पॅरिस- बहुचर्चित नियतकालिक चार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाजवळ आज चाकू हल्ला झाला. यात चार जण जखमी झाले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती फ्रान्सचे पंतप्रधान जिन कॅस्टेक्स यांनी माध्यमांना दिली आहे. परिसरात सुरक्षा पथके तैनात केली असून एका संशयिताला अटक केली आहे.

राजधानी पॅरिसवर दहशतवादी हल्ल्याचे सावट दिसत आहे. ११ डिस्ट्रिट ऑफ सेंट्रल पॅरिस येथील प्रसिद्ध नियतकालिक चार्ली हेब्दोच्या पूर्वाश्रमीच्या कार्यालयाजवळ हल्ला झाला. या घटनेची दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने तपासणी केली जात आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी हल्ल्याचा निषेध केला असून ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सरकारी सूत्राने म्हटले आहे. चाकू हल्ल्यात चार जण जखमी झाले असून पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. चार्ली हेब्दोच्या सध्याच्या कार्यालयाच्या पत्ता सुरक्षेच्या कारणावरून गुप्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारी २०१५ मध्ये चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. त्यावेळी दोन हल्लेखोरांसह १७ जण मृत्युमुखी पडले होते. हल्ल्यानंतर कार्यालय अन्य ठिकाणी स्थलांतरित केले होते. या हल्ल्यानंतर त्याचवर्षी पॅरिसमध्ये मुंबईप्रमाणेच दहशतवादी हल्ला झाला होता.

नदीच्या पूराती थरारक प्रसंग: चिमुकल्याला वाचवण्यासाठी बापाची यशस्वी झुंज

दरम्यान, चार्ली हेब्दो नियतकालिकाने मोहमंद पेगंबरांचे एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मुस्लीम धर्मियांमध्ये पेंगबरांना दृष्य स्वरुपात दाखवणे निषिद्ध मानले जाते. या आक्षेपार्ह व्यंगचित्रामुळे मुस्लीम जगतात संताप पसरला होता. त्यात काही दहशतवाद्यांनी चार्ली हेब्दोच्या कार्यालयात येऊन बेछूट गोळीबार केला होता. त्यात संपादकासह १७ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरोधात न्यायालयात सुनावणी होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: knifes attack near charli hebdo office 4 injured