26/11: कसाबसह खात्मा झालेल्या 10 दहशतवाद्यांसाठी हाफिज सईदची 'नापाक' सभा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

मुंबई हल्ल्याच्या 12 वर्षांनंतर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील साहीवालमध्ये ही सभा होणार आहे.

नवी दिल्ली : मुंबईमध्ये 2008 साली दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या नृशंस हल्ल्यात निष्पाप लोक मारले गेले होते. हा  हल्ला होऊन आज 12 वर्षे पूर्ण झाली. एकीकडे जग या हल्ल्याचा निषेध करत मृतांना श्रद्धांजली वाहत आहे तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये राजकारणाचा मुखवटा घातलेल्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेने मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या 10 दहशतवाद्यांसाठी आज एक विशेष प्रार्थना सभा ठेवली आहे. 

हेही वाचा - 'आम्ही भारताचे लोक'; कसे साकार झाले 'संविधान'?
मुंबई हल्ल्याच्या 12 वर्षांनंतर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील साहीवालमध्ये ही सभा होणार आहे. जमात-उद-दावा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटन लष्कर-ए-तय्यबाचा राजकीय चेहरा आहे. कुख्यात दहशतवादी हाफिज सईद या संघटनेचा प्रमुख आहे. इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्समधील सुत्रांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. ही सभा जमातच्या मस्जिदींमध्ये होणार आहे. यामध्ये मुंबई हल्ल्यातील 170 लोकांचा खात्मा करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्यात येईल. 

मुंबई हल्ल्यामध्ये 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर एक दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आलं होतं. कसाबला नंतर सुप्रीम कोर्टाने मृत्यूदंड ठोठावला होता. भारताने संपूर्ण जगासमोर पुरावे सादर करत हाफिज सईदला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड ठरवलं होतं. सईदवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून 10 दशलक्ष डॉलरचे बक्षिस घोषित करण्यात आले आहे. 

हेही वाचा - कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा लाट आल्याने रेडझोनमधील व्यवहारांवर बंधने

जमात-उद-दावाने जेके युनायटेड यूथ मूव्हमेंट नावाने एक राजकीय फोरम सुरु केले आहे. जेणेकरुन जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावादी कारवायांना मदत करता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला घेरण्याची पाकिस्तानची चाल यशस्वी न झाल्याने या प्रकारच्या कुटील कारवाया करण्याची गरज भासत आहे. मिळालेल्या अंतर्गत माहितीनुसार, लष्करचा चीफ ऑपरेशन कमांडर आणि त्याची जिहाद विंग सांभाळणाऱ्या जकी-उर-रहमान लखवी गेल्या काही दिवसांपूर्वी हाफिज सईदला भेटला होता. ही भेट सईदच्या लाहोरमधील घरात झाली होती. या मिटींगमध्ये जिहादसाठी फंड्स गोळा करण्यासंदर्भातील विषयांवर चर्चा झाली होती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lashkar e taiba in pakistan who carried out 2008 mumbai attacks planning prayer meet for terrorists