Video : कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीत हजर राहिले मांजर; म्हणाले 'मी वकील आहे'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

एका जजच्या समोर एक मांजर बोलताना दिसत आहे. मात्र जेंव्हा जजने विचारलं तेंव्हा त्या मांजराने उत्तरादाखल म्हटलं की, मी मांजर नाहीये. मी वकील आहे.

टेक्सास : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका वकील आणि जजचा झूमवरील ऑनलाइन बातचितीचा व्हिडीओ इंटरनेटवर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. एका जजच्या समोर एक मांजर बोलताना दिसत आहे. मात्र जेंव्हा जजने विचारलं तेंव्हा त्या मांजराने उत्तरादाखल म्हटलं की, मी मांजर नाहीये. मी वकील आहे. त्याचं झालं असं की, ऑनलाइन माध्यमातून सुरु असलेल्या सुनावणीच्या दरम्यान वकीलाकडून झूम मिटींगमध्ये मांजराचे फिल्टर लावले गेले. आणि ते काढून टाकण्याचा ऑप्शनच वकीलाला सापडत नव्हता. या दरम्यान झालेल्या गोंधळाचा मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ एक कोटी 62 लाख लोकांनी पाहिला आहे. 

काल मंगळवारी टेक्सासच्या एका कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान एका वकीलाने नजरचुकीने झूमवर कॅट फिल्टरला सुरु केलं. त्यानंतर अटॉर्नी रॉड पाँटन यांना हा कॅट फिल्टर काढून टाकण्यासाठी खूपच जद्दोजहद करावी लागली. सुनावणी दरम्यान ते एका बोलक्या मांजरासारखे दिसून येत होते. यामध्ये जज रॉय बी फर्ग्यूसन हे देखील या वकीलाला मदत करताना दिसून येत आहेत. जज रॉय यांनी म्हटलं की, मिस्टर पाँटन, मला वाटतंय की आपण व्हिडीओ सेटींगमध्ये जाऊन आपला फिल्टर सुरु केला आहे. या व्हिडीओत मजेशीर गोष्ट तेंव्हा घडते जेंव्हा वकील पाँटन जजला विश्वास देऊ पाहतात की, मी मांजर नाहीये. पुढे पाँटन म्हणताना दिसत आहेत की, मी माझ्या सहाय्यकाला बोलावलं आहे. आणि ती याला व्यवस्थित नेहमीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मी यासोबतच सुनावणीमध्ये उपस्थित राहण्यास तयार आहे. पाँटन यांनी पुढे म्हटलं की, मी लाइव्ह आहे आणि मी मांजर नाहीये. 

हेही वाचा - भारतीय नागरिकांना UAE मार्गे कुवेत-सौदी अरबियाला जाण्यास बंदी

हा व्हिडीओ आतापर्यंत 1 कोटी 60 लाख लोकांनी पाहिला असून आतापर्यंत 60 हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. दोन लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. या घटनेवर पाँटन यांनी म्हटलं की, मी माझ्या सेक्रेटरीचा कंम्प्यूटर वापररला ज्यामध्ये हा फिल्टर सुरु होता. मला नेहमीच चांगला वकील म्हणून प्रसिद्ध व्हायचं होतं. या मार्गाने का होईना पण मी आता सुप्रसिद्ध झाल्याचं त्यांनी मिश्किलीनं म्हटलं आहे. काही वेळानंतर फिल्टर बंद करण्यात यश आलं आणि मग सुनावणी नेहमीप्रमाणे झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lawyer turn off cat filter during court hearing appears like kitten

Tags
टॉपिकस
Topic Tags: