दहशतवाद्यांना पत्रे लिहा! पुस्तकातून विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला

पीटीआय
सोमवार, 29 मे 2017

या पुस्तकात दिलेला पत्रलेखनाचा सल्ला विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारा असून, यामुळे ते गोंधळून जातील किंवा त्यांच्यात नैराश्‍य पसरेल. जे तुम्हाला मारू इच्छितात, त्यांचा आदर कसा शक्‍य आहे.
- चेरीस मॅकगोवर्न, रिअल एज्युकेशन अभियानाचे प्रमुख

लंडन : दहशतवाद्यांचा हेतू समजून घेण्यासाठी त्यांना पत्रे लिहा, असा अजब सल्ला नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकातून शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.

दहशतवादावर आधारित या पुस्तकात युद्धाचा भाग म्हणून निर्दोष व्यक्तींचे सामूहिक हत्याकांड घडविणे यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मॅंचेस्टर येथील हल्ल्याच्या आठवडाभर अगोदर हे पुस्तक प्रकाशित झाले असून, आपला आदर होत नाही. आपल्याला न्याय्य वागणूक मिळत नाही, या समजातून दहशतवादी लोकांना मारतात, असे या पुस्तकात नमूद असल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.

सात ते अकरा या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अशा प्रकारचे पत्र लिहायला लावावीत. त्यांच्या मनात असणारे असे कोणतेही प्रश्न सहा प्रश्न त्यांना विचारायला लावावेत. असा सल्लाही या पुस्तकात देण्यात आला आहे. हे पुस्तक ब्रिलियंट पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आले असून, समीक्षकांकडून या पुस्तकावर जोरदार टीका होत आहे. विशेषतः प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक धोकादायक असून, विद्यार्थ्यांआडून दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याची भावना यामागे असल्याची टीका काही समीक्षकांनी केली आहे.
 

Web Title: letter to terrorists, book suggests students education